बोरवडे ते फराकटेवाडी या मार्गाने जाताना सुमारे अर्ध्या किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार तसेच फळाफुलांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटांमुळे गजबजलेली असंख्य झाडे प्रवाशांचे हमखास लक्ष वेधून घेतात. आंबा, पिंपळ, चिंच, कडुलिंब, आवळा, गुलमोहर, अशोक, आस्ट्रेलियन बाभूळ अशी असंख्य प्रकारांची झाडे या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या दिमाखात उभी आहेत. अर्थात ही झाडे तिथे आपोआप रुजलेली नाहीत तर काटेकोर नियोजन आणि प्रयत्नपूर्वक संवर्धन करून तेथे रुजवली.... वाढवली गेली आहेत. यासाठी फराकटेवाडी ग्रामपंचायतीने घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात वसलेली फराकटेवाडी म्हणजे अवघी उणीपुरी 900 च्या आसपास लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत होय. ही ग्रामपंचायत नेहमीच वेगवेगळ्या विधायक उपक्रमांमुळे जिल्ह्यात नावाजली गेली आहे. एक गाव एक गणपती, रासायनिक रंग विरहीत मूर्तींची स्थापना, पाण्यात न करता शेतात रक्षाविसर्जन, असे अनेक विधायक उपक्रम या गावाने हाती घेतले आहेत. तर 100 टक्के बायोगॅस आणि 100 टक्के शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करून या वाडीने स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाची कास धरली आहे.

विशेषतः पर्यावरण संवर्धनाबाबत फराकटेवाडी विशेष जागृत आहे. या गावात अपत्याचा जन्म, बारसे, वाढदिवस, लग्न, इतर आनंदोत्सव अशा विविध कार्यक्रम हे वृक्ष लागवड करून तसेच रोपे वितरीत करून साजरे केले जातत. पर्यावरण संवर्धनाबाबतच्या या कृतीशीलतेमुळेच या ग्रामपंचायतीने सलग तीन वर्षे पर्यावरण विकासरत्न पुरस्कार पटकाविला आहे. या गावातील जनतेने घेतल्या पर्यावरण संवर्धनाच्या ध्यासाचीच ही पोचपावती म्हणावी लागेल.

सुमारे तीन साडे तीन वर्षापूर्वी फराकटेवाडी ग्रामपंचायतीने ठराव पास करून बोरवडे ते फराकटेवाडी या अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्णय घेतला. आणि मग या मार्गावर दुतर्फा 10 ते 15 फुटांवर याप्रमाणे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी गावच्या सरपंच मनीषा फराकटे, उपसरपंच शामराव फराकटे आणि ग्रामविकास अधिकारी एस. वाय. कांबळे यांनी विशेष लक्ष दिले. ते केवळ वृक्ष लागवड करून थांबले नाहीत, तर लागवड केलेल्या रोपांच्या संवर्धनासाठी उपाययोजनांची तरतूदही त्यांनी केली. त्यानुसार रोजगार हमी योजनेतून गावातील तीन कुटुंबातील पती-पत्नींची नेमणूक करण्यात आली. अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनाबरोबरच गावातील तीन कुटुंबांना रोजगारही उपलब्ध झाला. नियमित पाणी देणे, खतांची मात्रा घालणे, औषध फवारणी करणे, शेळ्यामेंढ्यांपासून राखण करणे इत्यादींच्या माध्यमातून या रोपांचे काटेकोर संवर्धन केले गेले. परिणामी गेल्या तीन साडेतीन वर्षात ही रोपं झपाट्याने वाढली. आणि पाहता पाहता हिरवीगार झाडे झाली. आज या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 600 झाडे अंगाखांद्यावर पक्षांचा गोतावळा घेऊन आनंदाने डुलत आहेत. वाटसरूंना सावली देत आहेत. पाय मोकळे करायला गेलेल्या वृद्धांना विसावा देत आहेत. दमल्या-भागल्यांना गारवा देत आहेत.

पर्यावरण संतुलनाच्या बाबतीत झाडांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. झाडे पाऊस देतात, पाणी अडवितात आणि जमिनीची धूप थांबवून जमिनीमध्ये पाणी मुरवितात सुद्धा. म्हणूनच वृक्ष तोडीला आळा घालून मोठ्याप्रमाणात वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने फराकटेवाडीचे उदाहरण आपणा सर्वांना खूप काही महत्त्वाचे सांगून जाते. या गावात घराघरात बायोगॅस असल्यामुळे इंधनासाठी म्हणून झाडांची तोड मुळीच होत नाही.

उलट कंपोस्ट खताची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतात, बांदावर, परसदारात अशी सगळीकडे झाडे लावण्याची, ती वाढविण्याची, त्यांची जोपासना करण्याची वृत्ती आणि जागृती या गावातील ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेली आहे. परिणामी सरल्या उन्हाळ्यात महाराष्ट्रभर जरी दुष्काळाच्या...पाणी टंचाईच्या झळा जाणवल्या असल्या तरी हे गाव मात्र त्याला अपवाद ठरले. या गावात बारा महिने मुबलक पाणी उपलब्ध आहे. अगदी सात आठ फुटापर्यंत जमिनीत खोदले तरी खाली ओल लागते असा इथला अनुभव आहे. म्हणूनच झाडांचे महत्त्व या गावातील लोकांनी परिपूर्णपणे ओळखलेले आहे.

येत्या 01 जुलै रोजी राज्यात होणाऱ्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सकाळी 10 च्या आत जास्तीतजास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प या गावाने केला आहे. त्यादृष्टीने आबालवृद्धांपासून सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक दारात वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपांची मोठ्याप्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. केवळ झाडे लावायचीच नाही तर त्यांची पूर्णवाढ होईपर्यंत त्यांचे संवर्धन कसे करायचे याचेही नियोजन ग्रामस्थांनी केले आहे. आणि त्यादृष्टीने घरोघरी घेतला वसा...वृक्ष संवर्धन वृक्ष जोपासना ! हा नारा देत फराकटेवाडी कामालाही लागली आहे.

लेखिका - अर्चना जगन्नाथ माने,
माहिती सहाय्यक,
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

स्त्रोत : महान्युज