सध्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये लिथियम बॅटरींचा वापर होतो. या बॅटरीमुळे जलस्रोत आणि पर्यावरणामध्ये प्रदूषणाची समस्या वाढत आहे. मात्र अल्फाअल्फा (लुसर्न बिया) आणि पाईन रेसिन यासारख्या नैसर्गिक घटकांपासून बॅटरी निर्मिती स्विडन येथील उप्पसाला विद्यापीठातील संशोधकांनी केली आहे. याबाबत केमसुस केम या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
लिथियम आयन बॅटरी या अधिक ऊर्जा पुरवणाऱ्या असल्याने त्यांचा वापर वाढत आहे. भविष्यात विजेवरील वाहने व उपकरणासाठी संशोधन सुरू असल्याने वापरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लिथियम आधारित बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विषारी घटकांमुळे प्रदूषणामध्ये भर पडते. तसेच अशा टाकाऊ बॅटरीमुळे आग व छोट्या स्फोटाच्याही शक्यता निर्माण होतात. ते टाळण्यासाठी जुन्या बॅटरीतील लिथियम घटकाचा पुनर्वापर करतानाच सोबत जैव घटकांचा वापर करण्याची कल्पना स्विडन येथील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत राबविण्यात आली.

काय असते लिथियम बॅटरीमध्ये?

लिथियम आयन बॅटरीमध्ये प्रामुख्याने लिथियम कोबाल्ट ऑक्साईडचा वापर असतो. यात अधिक ऊर्जा घनता साठत असली तरी तुटल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची असते.

लिथियम आयर्न फॉस्फेट, लिथियम मॅंगेनिज ऑक्साइड, लिथियम निकेल मॅंगेनिज कोबाल्ट ऑक्साइड यातून कमी ऊर्जा मिळत असली तरी अधिक काळ टिकते. धोका कमी असतो.

पर्यावरणपूरक बॅटरीची संकल्पना

उप्पसाला विद्यापीठातील अँगस्टॉर्म प्रयोगशाळेमध्ये पर्यावरणपूरक बॅटरीसाठी नवी संकल्पना राबवली आहे.

सध्या ऊर्जा ग्रहण आणि वापराच्या वेळी उत्सर्जन करणाऱ्या रासायनिक घटकांऐवजी सेंद्रिय पदार्थांचा वापर करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये अल्फा अल्फा आणि पाईन रेसिनसारखे घटक उपयुक्त ठरले आहेत. हे पदार्थ कमी ऊर्जेमध्ये पुनर्वापरयोग्य होतात. तसेच त्यात असलेली इथेनॉल आणि पाणी असे घटक पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.

संशोधक काय म्हणतात...

जुन्या बॅटरीतील लिथियमचा वापर नव्या बॅटरीमध्ये करणे शक्य असून, त्यामध्ये काही जैव घटकांचा वापर करावा लागतो. जुन्या बॅटरीइतकीच (99 टक्के) ऊर्जा त्यातून उपलब्ध होते. यामध्ये अधिक अभ्यास करण्यात येत असून, त्यातील एक टक्का त्रुटी कमी करण्यात येईल, असे संशोधक डॅनियल ब्रॅंडेल, क्रिस्टिना इडस्टॉर्म, स्टिव्हन रेनॉल्ट यांनी सांगितले.

स्त्रोत: अग्रोवन