पावसाळ्यात ‘कृषी दिवस’ व वन ‘महोत्सवा’चे औचित्य साधून 1 जुलै, 2016 रोजी एकाच दिवशी राज्यात किमान 2 कोटी वृक्ष लागवड करण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा शासनाने निश्चित संकल्प केला आहे. राज्यातील वृक्ष आवरणाचे प्रमाण सर्व साधारण 20 टक्के आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेले निसर्ग व ऋतूचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या माध्यमातून निसर्ग आपल्याला त्याच्या असंतुलनाची जाणीव करून देत आहे. यासर्व निसर्गचक्रात वृक्षसंपदेला महत्वाचे स्थान आहे. अशा या वृक्षसंपदेचे महात्म्य भारताच्या सर्वच प्राचीन संस्कृतींमधून वर्णन केल्याचे दिसून येते. पोषण करणाऱ्या, अन्न देणाऱ्या, सावली देवू करणाऱ्या वृक्षांना देवतासमान मानले आहे. त्यांची पूजा-अर्चा करून, प्रार्थना करून किंवा देवाचे स्वरूप मानून त्यांची आराधना केलेली दिसते. मूलतो ब्रम्हरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे।अग्रम: शिवरूपाय वृक्षराजाय ते नम:॥अश्वत्थ ! यस्मिन् त्वयि वृक्षराज !नारायणेतिष्ठति सौरिवारे । अतः श्रुतस्वं सततं तरुणांधन्योsसि चानिष्टविनाशकोsसि ।।य इदं शृणुते भक्त्या नरोश्र्वत्थस्य सन्निधौतारकग्रहदोषाणं शीघ्रमेव विनश्यति भारतातही वृक्षसंपदा ही व्यक्तिगत व सामाजिक जीवनाचा अंगभूत हिस्सा असल्याचे दिसून येते. “नक्षत्रवृक्ष”, “इष्टवृक्ष” अशा रूपात प्रत्येक माणसाला आयुष्यात त्या एका वृक्षाला तरी पुजायला, त्याचे संगोपन करायला, त्याच्या सहवासात वेळ घालवायला सांगितले गेल्याचे दिसते. यावरून असा हा वृक्ष खरोखरी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” झालेला दिसून येतो. मनुष्याचा लालसा हा अवगुण गृहित धरून वृक्षांना अशा प्रकारे महत्व दिल्याने त्यांचे संवर्धन व संगोपन होईल व वृक्षसंपत्ती अबाधित राहिल, अशा हेतूने व वृक्षांप्रती आपला आदर व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांना देवतेचा दर्जा बहाल केल्याचे दिसते.वैदिक परंपरेतही वृक्षारोपण व वृक्ष पूजनाची विशेष परंपरा होती. प्रयागक्षेत्राचा अक्षयवट, नाशिकची पंचवटी, अवंतिकेचा सिद्धवट, गयेचा बोधी वृक्ष, वृंदावनचा वंशीवट हे ह्या वृक्षांसंबंधी असलेल्या श्रद्धेचेच मूर्तिमंत उदाहरण होत. वेद व आरण्यकांमध्ये वृक्षांच्या महतीचे गोडवे गायलेले आढळतात. मत्स्यपुराण, अग्नीपुराण, पद्मपुराण, नारदपुराण, रामायण, भगवद्गीता, शतपथब्राह्मण इत्यादी ग्रंथांमधून वृक्षांना देवता, लोकदेवता मानले गेल्याचे उल्लेख येतात. श्रीमदवल्लभाचार्यांचा जन्मही चंपकारण्यात झाला याविषयी उल्लेख येतात. मराठी साहित्यात शिवलीलामृतात पुढील ओळी येतात : साल तमाल देवदार ॥ आम्र कदंबादि तरुवर ॥त्या वनी नेऊनि सत्वर ॥ म्हणे शंका सांडी सर्वही ॥38॥गोरक्षनाथ व कानिफनाथांमधील अनोख्या प्रसंगाचे वर्णन करताना पुढीलप्रमाणे पंक्ती दिसतात :तों दृष्टीसमोर आम्रवन ॥ पक्क फळी देखिलें सघन ॥तेंही पाडाचें पक्कपण ॥ शाखा व्यक्त ॥ झोंबल्या आहेत ह्या वृक्षीं ॥49॥परी ऐसी फळें सुगम दिसती ॥ तरी भक्षण करावें वाटे चित्तीं ॥यावरी गोरक्ष बोले युक्तीं ॥ नको नको म्हणतसे ॥50॥ तसे पाहावयास गेले तर सर्वच धर्मांमध्ये, संस्कृतींमध्ये वेद, पुराण, सूफी साहित्य, कुराण, बायबल, जातककथा इत्यादिंमधून वृक्षांच्या लोककल्याणकारक रूपाचे गुणगान केलेले आढळते. पंचतंत्रासारख्या रंजक, शैक्षणिक कथांमध्येही वृक्षमहती वर्णिली आहे. नदी, पर्वत, वृक्ष यांचा आदर सन्मान ही बहुदा सर्वच प्राचीन संस्कृतींची ओळख आहे, असे म्हणता येईल. हडप्पा-मोहंजदडो येथे झालेल्या उत्खननातूनही लक्षात येते की, तेव्हाच्या समाजात मूर्तिपुजेबरोबरच वृक्ष व प्राणीमात्रांची पूजाही करण्यात येत असे.भारतीय साहित्यातही वृक्षपूजेचे अनेक उल्लेख पावलोपावली येत राहतात. तसेच शिल्पकला, वास्तुकला, चित्रकलेतही वृक्षपूजा पाहावयास मिळते. अजंठाच्या गुंफाचित्रात, सांचीच्या तोरणस्तंभात वृक्षपूजा दृष्टोत्पत्तीस येते. बौद्ध व जैन साहित्यात तर वृक्षपूजेला विशेष स्थान आहे. बोधिसत्वाने वृक्ष देवता बनून जन्म घेतल्याचे उल्लेख आहेत. शिल्पांमध्ये वृक्षींच्या सौष्ठवपूर्ण मूर्ती व त्यांच्या आधारासाठी असलेले तरू यांचे नयनरम्य दर्शन घडते. प्राचीन साहित्यात खालील वृक्षांना मानाचे स्थान दिले गेले आहे. अश्वत्थमेकं पिचुमंदमेकंन्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम्।कपित्थबिल्वामल मलकत्रयंचपञ्चाम्रवापी नरकं न पश्यते ।। वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, बेल, आंबा, कवठ व अशोक या वृक्षांचे रोज दर्शन घेतल्याने, संगोपन केल्याने मनुष्यजन्म सार्थ होतो, असे त्यात म्हटले आहे. बृहत्संहिता, चरकसंहिता, आयुर्वेदीय ग्रंथ, अथर्ववेदांत ठिकठिकाणी विविध वृक्ष व त्यांचे आरोग्य, परिसरावर होणारे कल्याणकारक परिणाम यांचे उल्लेख येत राहतात. स्कंदपुराणात ‘पंचवटी’ म्हणजेच पाच सावली देणाऱ्या वृक्षांच्या वैशिष्ट्यपूर्ण लागवडीचा उल्लेख येतो. त्यानुसार वड, पिंपळ, आवळा, बेल व अशोक वृक्ष कसे, कोणत्या दिशेने, क्रमाने, अंतराने व कशा प्रकारे लावावेत यांचे विधीवत वर्णन आहे.कल्पवृक्षाचा अनेक ठिकाणी मनोरम कल्पनाविलासही आढळतो. सर्व इच्छा पूर्ण करणारा हा वृक्ष प्रतिभेचा एक सुरम्य आविष्कारच म्हणता येईल. महाभारतातही अनेक वृक्षांचे महत्त्वपूर्ण उल्लेख येतात. शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली अस्त्रे, इंद्रप्रस्थात असलेले वृक्ष, पांडवांचा वनवास तर रामायणात पंचवटी, दंडकारण्य, अशोकवाटिका असे कैक उल्लेख त्या काळच्या वृक्षराजीविषयी संकेत देऊन जातात.भगवान बुद्धांच्या आयुष्यात तर वृक्षसंपदाविषयक उल्लेख ठायीठायी येतात. एक तर त्यांचा जन्म मुळात लुंबिना वनात झाला. ज्या वृक्षाखाली त्यांचा जन्म झाला त्या वृक्षाचे नाव सालवन किंवा शाल्मली. त्याच्या शाखेला धरून त्याची माता माया उभी आहे व प्रसववेदना सहन करते आहे अशी अनेक चित्रे, शिल्पे पाहावयास मिळतात. त्यांच्या बालपणातही प्रासादाच्या सभोवताली उपवन, वाटिका असल्याचे उल्लेख येतात. त्यांची पहिली समाधी जांभुळ वृक्षाच्या छायेत, सम्यक ज्ञान- बोधि प्राप्ती पिंपळ वृक्षाच्या तळाशी महानिर्वाण हे साल वृक्षाच्या तळाशी झाल्याचे म्हटले जाते. त्यांनी भरपूर भ्रमंती केली त्या काळातही त्यांचा मुक्काम बऱ्याचदा गावाबाहेरच्या उपवनांमध्ये, वाटिकांमध्ये राहायचा. वैशालीतील आम्रपालीचे आम्रवन, नालंदा-पुरवारीक/ पावरिक-पिपिला-अनुप्रिय आम्रवनांचे उल्लेख त्यांची प्रिय मुक्कामाची ठिकाणे म्हणून येतात. जीवकाचे, राजवैद्याचे चिकित्सालयही आम्रवाटिकेत असल्याचे उल्लेख येतात. तिथेच त्याने जखमी अवस्थेतील बुद्धाच्या जखमांवर मलमपट्टी केली. इथेच बुद्ध मुक्कामी असताना अजातशत्रू त्यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असे. जीवकाने हे आम्रवन नंतर बौद्ध धर्माला अर्पण केले. बुद्धांनी एका आम्रवनात हात धुतले तर त्यांनी जिथे जिथे ते पाणी शिंपिले तिथे तिथे आम्रतरू बहरून आले असे प्रासादिक वर्णनही आढळते. तीर्थंकरांनाही जे कैवल्यज्ञान प्राप्त झाले ते कोणत्या ना कोणत्या वृक्षाच्या छायेत झाले. म्हणूनच त्या वृक्षांना कैवली वृक्ष संबोधिले गेले आहे.कुराणातही खजूर, अंजीर, बोर, डाळिंब, मेंदी, द्राक्ष, तुळस आदी वनस्पती/वृक्ष पूजनीय मानले आहेत. शीख धर्मातही वृक्षांना देवतांसमान मानून गुरूकार्यासाठी उपयोगी पडणाऱ्या धर्मस्थळाजवळच्या बागेला “गुरू की बाग” म्हणून संबोधिले आहे. त्यातील काही वृक्ष ह्यांप्रमाणे : रीठासाहेबांचा रीठा वृक्ष, नानकमतांचा पिंपळ वृक्ष, टाली साहेबांचा शिसवी (रोझवुड), बेर साहेब प्रमुख वृक्ष आहेत. त्याशिवाय दु:खभंजनी बेरी, बाबा की बेरी, मेहताबसिंग की बेरी हे वृक्षही महत्वाच्या वृक्षांच्या यादीत सामील आहेत. पूर्वीपासून सर्व जातीधर्माच्या साधुसंत महात्म्यांनी वृक्षांच्या संगोपनाचा, संवर्धनाचा प्रसार करून निसर्गासोबत असलेले माणसाचे नाते जोडून ठेवले असल्याचे दिसते.परंतू आज जेव्हा वने पृथ्वीवरून मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत किंवा केली जात आहेत तेव्हा वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व संगोपनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. गायराने, जंगले विकासाच्या नावाखाली भक्ष्यस्थानी पडत आहेत. अनेक दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा उशिराने येणारा मान्सून हेदेखिल जंगलतोडीचे किंवा वृक्षतोडीचा परिणाम आहे. एखाद्या वर्षी दर महिन्याला हजेरी लावणारा पाऊस तर कधी कधी अचानक येणारी उष्णतेची लाट. या सर्व परिस्थितीला माणसाने निसर्गाबद्दल दाखविलेली कृतघ्नता कारणीभूत आहे. या जगात कोणतीही गोष्ट तोडणे जितके सोपे आहे, तितकीच ती जोडणे कठीण किंवा अशक्य आहे. एक वृक्ष तोडायला काही मिनीटांचा वेळ पुरेसा असतो. पण त्याच ठिकाणी रोपाचे रूपांतर वृक्षात होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जावू द्यावा लागतो. या आपणच निर्माण केलेल्या परिस्थितीवर आपणच तोडगा शोधून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन हे एकाच दिवसापुरते मर्यादित न राहता ती अखंड चळवळ बनणे गरजेचे आहे.जल व वनसंपत्ती या निसर्गचक्राचे आधार आहेत. त्यांचे रक्षणच नव्हे तर ती वाढविण्याची गरज आहे. त्या संपत्तीचे संवर्धन झाले तर वाढत्या प्रदूषणातही पर्यावरण संतुलनावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळे पैशाच्या मागे धावणाऱ्या आपल्या पिढीने जगात पुन्हा एकदा वृक्षांचा आदर, सन्मान, संगोपनाची संस्कृती निर्माण करून पुढच्या पिढीला हरित व बहारदार सृष्टिची भेट देवून कायमस्वरूपी निसर्गाचा आदर करण्याचे संस्कार येणाऱ्या पिढीवर केले पाहिजेत.लेखिका - अर्चना वि. देशमुख,माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार. स्त्रोत : महान्युज