राज्यात 1 जुलै, 2016 रोजी जनतेच्या सहभागातून दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविल्यामुळे वृक्ष लागवडीला मोठे यश मिळाले. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये घेण्यात आली. सर्व वयोगटातील लोकांच्या प्रामाणिक आणि स्वयंस्फूर्त सहभागाने हे यश संपादन करता आले. हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय हरित सेना कार्य करीत असून त्याअंतर्गत विद्यार्थी हरित सेना निर्माण करण्यात येत आहे.

सध्या जगात पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता हे मानवी समूहासमोरील मोठे आव्हान आहे. बहुतेक सर्व समस्यांचे मूळ हे आपल्या पर्यावरणविषयक प्रवृत्तीमध्ये दडलेले आहे. लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असून देशाचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत गोडी व जागरुकता निर्माण केल्यास भावी काळात त्याचा निश्चितच चांगला परिणाम अनुभवायला मिळेल. या विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक उपक्रम राबविण्यासाठी दिशा देण्याचे कार्य वन विभागामार्फत करण्यात येत असून त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभागातून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या सद्य:स्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये त्यांना सहभागी करुन घेणे आणि त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जागृती करणे व लोकसहभाग वाढवणे ही राष्ट्रीय हरित सेना कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत. थोडक्यात पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण असलेली व संवेदनशील नवीन पिढी तयार करण्याचे महत्वाचे कार्य याद्वारे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यात राष्ट्रीय हरित सेना योजना प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 250 शाळांमधून राबविण्यात येते. सध्या राज्यात एकंदर 8807 शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत पर्यावरण चमू (इका-क्लब) स्थापित करण्यात आले आहेत. या योजनेस बळकटी देण्यासाठी वन विभागातर्फे ‘विद्यार्थी हरित सेना’ निर्माण करण्यात येणार आहे. शासनाने नुकतीच या उपक्रमाला मान्यता दिली असून त्याचा तपशील जाहीर केला आहे.

राष्ट्रीय हरित सेनेचे उपक्रम

इको-क्लब शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या सद्य:स्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे.

पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन व पेरणी.

रोपवाटिका निर्मिती, वृक्ष लागवड करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करणे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणविषयक दिन व सणांचे औचित्य साधून पर्यावरणविषयक जनजागृती करण्याचे उपक्रम.

नॅशनल जिओग्राफीक एक्स्प्लोरर या पुस्तकाद्वारे पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि या सर्वातील परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास करण्यात येतो. विद्यार्थी हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तराशी सुसंगत असेलेली ही पुस्तकेसुद्धा वाचनासाठी या योजनेमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी हरित सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड, संरक्षण आणि संवर्धन या कामाबरोबर वन, वन्यजीव, वनीकरण, निसर्ग, पर्यावरण, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या क्षेत्रात विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आवड निर्माण करणे शक्य होणार आहे. विद्यार्थी हरित सेना उपक्रमाद्वारे जिल्ह्याजिल्ह्यात कोणता जिल्हा विद्यार्थी हरित सेनेच्या नोंदणीत प्रथम क्रमांकावर येतो यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. त्यातून एक निकोप स्पर्धा आणि एक सुंदर वातावरण निर्मितीही घडू शकते.

विद्यार्थी हरित सेना योजना वनविभागातर्फे प्रायोगिक तत्वावर राज्यात राबविण्यात येणार असून तीन वर्षांनंतर या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.

लेखक - जयंत कर्पे
माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

स्त्रोत - महान्युज