पर्यावरण संरक्षणाबाबत जागतिक मंथन होताना अमेरिकेने बदललेली भूमिका आणि वाढत्या लोकसंख्येचा दबाब या पार्श्वभूमीवर 5 जून रोजीचा पर्यावरण दिन समोर आहे. याबाबत भारतीयांची भूमिका आणि वास्तव याबाबत हा विशेष लेख.पर्यावरण आणि पर्यावरण संतुलन हे हल्ली खास चर्चेचे शब्द आणि विषय ठरले आहेत. पर्यावरण राखण्यासाठी सर्वांनी मान्य केलेल्या पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. भारतात आलेला मान्सून आणि त्या आधी संपूर्ण भारतात उच्चस्तरापर्यंत सातत्य राखणारा तापमानाचा पारा या सर्व पार्श्वभूमीवर 5 जून रोजी आपण यंदाचा जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत आहोत.

बिघडलेले पर्यावरण हे सर्वांना दिसते आणि मान्यदेखील आहे. अशा स्थितीत यापुढील काळात या संदर्भात होणाऱ्या आवश्यक बदलांचा धांडोळा घेताना कुठेतरी ग्राहककेंद्री आणि भांडवलशाही वृत्तीतून समस्या वाढीला लागत आहे. हे सर्वांना मान्यच करावे लागेल.जगात असणारी लोकसंख्या या सर्वांचे मूळ कारण आहे. ही लोकसंख्या सर्वाधिक आशिया खंडात आहे. एकूण लोकसंख्येच्या साधारण 50 टक्के लोकसंख्या या खंडात आहे. लोकसंख्येत चीन आणि भारत शंभर कोटींचा आकडा पार झाल्यानंतरच्या स्थितीत विकासाचा वाटेवर आहेत.

विकास ही संकल्पना सर्वांना हवी आहे. मात्र त्यासाठी पर्यावरणावर परिणाम झाल्याखेरीज विकास शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विकासासाठी द्यावं लागणार पर्यावरणाचं मोल आणि विकासगती राखण्याचे उद्दीष्ट यांचा समतोल साधणे ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे.येणाऱ्या काही वर्षात भारत महासत्ता म्हणून समोर आणायचं स्वप्न प्रत्येकाच्या मनात आहे. हे स्वप्न साकारताना आपण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण न करता वेगळा मार्ग राखू शकतो. आपल्या समृध्द अशा संस्कृतींन ते आजवर दिलयं ते काय आहे. याची आठवण ठेऊन आपण वाटचाल केल्यास अनेक बाबींवर आपणास उत्तरं सापडतील.

वाढत्या शहरीकरणासोबत भांडवली नफावादी व्यवस्थेने निर्माण केलेले विश्व आपण डोळे उघडून बघितले पाहिजे या नव्या व्यवस्थेने प्रत्येक व्यक्तीला कचरा उत्पादक करून टाकलयं. सकाळी उठल्यावर चहा सोबतच्या ब्रेड आणि बिस्कीटच्या पुड्याने याची सुरूवात आपण करतो. साधारण जीवनशैली मानणारे आपण हल्ली जुने विचार विसरलो. त्यामुळे आपला प्लास्टीकचा वापर अमर्याद वाढला आहे. कधी काळी बाजारात पिशवी घेऊन जाणारे तुम्ही आम्ही मिळेल ना कॅरिबॅग म्हणत रिकाम्या हाताने फिरणं पसंत करतोय. यात नवी पिढी अधिक अग्रेसर आहे.

दुसऱ्या बाजूला या पिढीला ईएमआय अर्थात सुलभ हप्त्यांवर कर्ज देणारी वित्त व्यवस्था विकसित झाली. त्यात अनेक औद्योगिक उत्पादकांनी आपले उत्पादन आणि आपलाच वित्तपुरवठा यांच्या मदतीने वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाहनसंख्या वाढीला लावली आहे.वाढत्या वाहन संख्येने अतिशय घातक, असे परिणाम समोर येत आहेत. वर्षाकाठी साधारणपणे दीड लाख जण या वाहनांच्या अपघातात जीव गमावतात यासोबत ध्वनी आणि वायू प्रदूषणात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वायू प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि त्यावर होणारा खर्च व अखेरीस त्यातून होणारे मृत्यू असे परिणाम वेगळेच दिसतात.

या वाढलेल्या सर्व समस्यांमध्ये सर्वात मोठी भर पडली आहे.ती कार्बन उत्सर्जनासाठीच्या परकीय गंगाजळीची. आपला देश सौदी किंवा अमेरिका अथवा व्हेनेझुएलाप्रमाणे तेल उत्पादनात स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे इतर देशांकडून इंधन खरेदीसाठी खर्च होणारा पैसा आपणास डॉलरच्या रूपाने द्यावा लागतो. आता इंधन दरावरील शासकीय नियंत्रण संपले असल्याने प्रत्येक नागरिकावर पडणारा आर्थिक भार हा आता अप्रत्यक्ष न पडता प्रत्यक्षपणे पडतोय इतकाच काय तो फरक. मात्र यामुळे इंधनाचा वापर कमी झालेला नाही हे वास्तव.आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला शुध्द पेय जल मिळावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी आधारित व्यवस्था आहे. यात प्राधान्यक्रम राखताना नागरिकांचा प्रत्यक्ष कोणताच सहभाग दिसत नाही असं दुर्देवाने म्हणावं लागतं.

आपण जी ऊर्जा वापरतो ती देखील मुख्यत्वे औष्णीक विद्युत आहे. जरी कोळशाचे साठे मुबलक असले तरी ते कधी ना कधी संपणार, त्यामुळे त्याच्या वापराबाबत प्रत्येक व्यक्ती जागरुक असली पाहिजे तीच बाब शहरात पुरविल्या जाणाऱ्या शुध्द पेयजलाबाबत या ठिकाणी त्याच्या शुध्दीकरणासाठी लागणारा पैसा आपलाच आहे. मात्र त्या पाण्याचाही वापर आपण सांडपाणी म्हणून करतो त्यावेळी निश्चितपणाने वाईट वाटतं. जगासोबत चालण्यासाठी जगासारखं वागलं पाहिजे ही वृध्दी आपल्या देशात पर्यावरणास मारक ठरत आहे.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.....वनचरे....! असे सांगणारे संत आणि वृक्षांशी सण-परंपरांची नाळ जोडलेली आपली संस्कृती आहे. केवळ शालेय स्तरावर पर्यावरण विज्ञान हा 100 गुणांचा विषय न राहता तो आपल्या अस्तित्वाचा आणि पुढच्या पिढीला आपण काय देणार याचा विषय म्हणून प्रत्येकाने जाणून घेतला आणि जीवनशैलीत अनुसरला तरच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं संरक्षण आपण करू अन्यथा तो देखील एक 'साजरा' करायचा दिवस असंच म्हणावं लागेल.

लेखक: प्रशांत अनंतराव दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी

माहिती स्रोत: महान्युज