रामेठा : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४)फळ.रामेठा : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४)फळ.रामेठा : (रामी; क. मुकुते, एण्णुजरिगा; इं. वूली हेडेड निडिया; लॅ. लॅसिओसायफन एरिओसेफॅलस; कुल थायमेलेसी). फुलझाडांपैकी वनस्पति,आवृतबीज उपविभाग सु. १·८–३ मी. उंच व अनेक फांद्यांचे झुडूप अथवा लहान वृक्ष. याचा प्रसार भारतात दक्षिण पठारावरील उंच टेकड्या, कारवार, कोकण, सह्याद्री, केरळ, निलगिरी, पळणी व तिनेवेल्ली टेकड्या इ. ठिकाणी सु. १,२०० –२,१०० मी. उंचीपर्यंत आहे; शिवाय श्रीलंकेतही हे आढळते. ही एकच जाती भारतात असून हिच्या प्रजातीतील जगात एकूण सु. ५० जाती आहेत. खोडावरची साल करडी व किंचित गुळगुळीत असून अंतर्साल सूत्रल (धागेदार) असते.

पाने साधी, समोरासमोर वा विखुरलेली, वरच्या बाजूस निळसर हिरवी व खालच्या बाजूस लवदार, लहान देठाची, लांबट, आयत, भाल्यासारखी व टोकदार, ५–८ X २·५ –३ सेंमी. असतात. फुले द्विलिंगी, बिनदेठाची, लहान पिवळी असून ती खोडावर अग्रस्थ (टोकाकडे) किंवा फांद्यांच्या शेवटी गोलसर गुच्छासारख्या फुलोऱ्यात स्तबक; पुष्पबंध डिसेंबर ते मेमध्ये येतात. छदमंडलावर रेशमी केसांचे आवरण असून त्यात पाच परिदले जुळून बनलेली नलिका सु. १ सेंमी. लांब व केसाळ असते. ही नलिका वरच्या बाजूस पसरट व सुट्या पाकळ्यांची असते; स्वतंत्र संदले नसतात. केसरदले दहा परंतु त्यांचे तंतू लुप्त असून फक्त परागकोशाची दोन वर्तुळे असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात एकच बीजक असते फूल. फळ शुष्क, लहान, १ – १·३ सेंमी. लांब, दीर्घवृत्ताकृती, टोकदार असून परिदलांनी वेढलेले असते.

फळांची साल पातळ असून त्यात एकच बी असते; बीजाचे आवरण कवचासारखे असते. खोडाच्या सालीपासून काढलेल्या वाखाचा उपयोग कागदनिर्मितीत कच्चा माल म्हणून करतात. साल व पाने विषारी आणि जहाल असून मत्स्यविषाकरिता वापरतात. सालीतील राळेमुळे कातडीवर फोड येतात. पाने सुजेवर व मुक्या मारावर लावण्यासाठी वापरतात. संदर्भ : 1. Chopra, R. N. and others, Poisonous Plants of India, Vol. II, New Delhi,1965. 2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश