यलो एल्डर : ( क. कोरैणक्लर; इं. ट्रंपेट फ्लॉवर; लॅ. टेकोमा स्टान्स, स्टेनोलोबियम स्टान्स; कुल - बिग्नोनिएसी). हे मोठ्या आकाराचे झुडूप (अथवा लहान वृक्ष) फुलांच्या शोभेसाठी बागेत सर्वत्र विशेषत : कुंपणासाठी लावतात. हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील परंतु आता उष्ण कटिबंधीय प्रदेशांत सर्वत्र आढळते. भारतात सु. १, ५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात त्याचा प्रसार दिसून येतो. फांद्या चौकोनी असून साधारणत: जमिनीजवळून येतात; साल फिकट तपकिरी व मऊ; पाने समोरासमोर, जात्यसम ( वरची जोडी खालच्या जोडीशी काटकोनात), संयुक्त, विषमदली व मोठी असतात. दले ५– १०, समोरासमोर, लांबट टोकांची, दातेरी कडांची आयत-कुंतसम ( भाल्यासारखी), गुळगुळीत व खालच्या बाजूस फिकट असतात. लहान फांद्यांच्या टोकास लोंबत्या मंजिऱ्यांवर पिवळी धमक, थोडी सुगंधी व मध्यम आकाराची ( सु. ५ सेंमी. लांब व ३· ५ सेंमी. व्यास) फुले सप्टेंबर-डिसेंबरात अधिक पण थोडी इतर महिन्यांतही येतात. संवर्त हिरवा, पेल्यासारखा व पुष्पमुकुट काहीसा पिवळा, नसराळ्या (तुतारी) सारखा असून (त्यावरून ‘ट्रंपेट फ्लॉवर’ हे इंग्रजी नाव पडले आहे) पाच पाकळ्यांपैकी तीन सरळ व दोन वर वळलेल्या असतात; फुलात गर्द शेंदरी रेषा दिसतात. एक वंध्य केसरदल व चार दीर्घद्वयी (दोन अधिक लांब) कार्यक्षम असतात; बिंब वलयाकृती व त्यावर किंजपुट असतो. शेंगेसारखी दिसणारी व झुबक्याने येणारी बोंडे ( १२– २० X ७ सेंमी.) फुटीर, लांबट, पसरट असून प्रथम हिरवी व नंतर तपकिरी होतात. बीजे अनेक व दोन पंखयुक्त. ही झुडपे वैराण जागेतही आपोआप वाढतात. धुपलेल्या जमिनीत लागवडीस योग्य असून नवीन लागवड बियांपासून करतात. लाकूड फिकट पिंगट, कठीण व टिकाऊ असून त्याला रंधून व घासून झिलई करता येते. मूळ तीव्र मूत्रल (लघवी साफ करणारे), कृमिनाशक व पौष्टिक असते. त्याचा बीअर (मद्य) बनविण्यात उपयोग करतात. सं दर्भ : 1. Cowen, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965. 2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976. लेखक - सुधाकर देशपांडे KH - 14 - P - 58 - 1 KH - 14 - P - 58 - 2.jpg 58 - 3.jpg 58 - 4.jpg 58 - 5.jpg स्त्रोत - मराठी विश्वकोश