मोरिंगेसी : (शेवगा कुल). फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील या लहान कुलाचा समावेश सॅपिंडेलीझ किंवा अरिष्ट गणात केला आहे. या कुलात फक्त एकच प्रजाती आणि तिच्यातील तीन जातींचा समावेश होतो. ते सर्व पानझडी व जलद वाढणारे वृक्ष असून सिंध, बलुचिस्तान, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका व भारत (पश्चिम हिमालय, राजस्थान, कोकण व दख्खन) या प्रदेशात विशेषेकरून आढळतात. त्यांची लागवडही केली जाते. यांची खोडे मऊ असतात व सालीतून डिंक पाझरतो. पाने मोठी, एकाआड एक, संयुक्त असून ती दोन- तीनदा पिसासारखी विभागलेली असतात. दले व दलके यांच्या तळाशी सूक्ष्म प्रपिंडे (ग्रंथी) असतात.

फुलोरा कुंठित परिमंजरी पुष्पबंध असून फुले मध्यम आकाराची, द्विलिंगी, पांढरी किंवा फिकट पिवळसर असतात. पाच संदलांचे मंडल आकाराने पेल्याच्या आकाराचे आणि पुष्पमुकुटाच्या रंगाचे असते. प्रदले (पाकळ्या) पाच असून वरची दोन लहान, पुढील एक मोठे व बाजूची दोन उभट असतात. एकूण दहापैकी पाच केसरदले वंध्य व पाच कार्यक्षम असतात; ती सर्व संदलमंडलाच्या आतील एका वलयाकार बिंबावर असून परागकोशधारी दले पाकळ्यांसमोर व वंध्य दले त्यांच्या एकाआड एक अशी मांडणी असते. परागसिंचन कीटकांकडून होते. फळे लांब, शेंगासारखी, दोन्हीकडे टोकदार व रेषांकित ३–६ कोनी असून तडकल्यावर त्यांतून अनेक त्रिपक्ष किंवा अपक्ष बिया बाहेर येतात व वाऱ्याने पसरविल्या जातात. शेवगा व सुज्ना ह्या या कुलातील महत्त्वाच्या वनस्पती होत. खाद्य शेंगा व शोभा यांसाठी हे वृक्ष लावतात.

संदर्भ : Lawrence, G. H. M. Taxononty of Vascular Plants, New York, 1965.

लेखक - शां. ब. मुजुमदार

स्त्रोत - मराठी विश्वकोश