पोलकी (क. बिलितले, भुतले; लॅ. गिव्होशिया रॉटलरिफॉर्मिसकुल-यूफोर्बिएसी). हा मध्यम आकारमानाचा व जाडजूड फांद्यांचा वृक्ष भारतात दक्षिणेच्या पठारावरील पानझडी जंगलात व श्रीलंकेत आढळतो. ह्या वनस्पतीच्या वंशातील (गिव्होशियातील) एकूण ३–४ जातींपैकी भारतातील ही एकच जाती आहे. ह्या वृक्षाच्या खोडाची साल साधारण जाड, तपकिरी रंगाची व गुळगुळीत असून तिचे साधारण गोलसर, जाड व फुगीर तुकडे पडून गेल्यावर तेथे खाचा पडतात. कोवळे भाग, फुलोरे व पानांची खालची बाजू यांवर तारकाकृती केसांची लव असते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, सु. २५ सेंमी लांब, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती, गोलसर दातेरी, काहीशी विभागलेली, चिवट व लांब देठाची असतात. पात्यांच्या तळातून अनेक प्रमुख शिरा निघून पात्यात पसरलेल्या असतात. फुले लहान, एकलिंगी व पानांच्या बगलेत, वल्लऱ्यांवर उन्हाळ्यात येतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच; बिंब खंडित; नर-फुलात १३–२५ केसरदले; स्त्री-फुलात २–३ कप्प्यांचा किंजपुट तीन किंजदलांपासून बनलेला असतो [फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ सु. २·५ सेंमी. व्यासाचे व हिरवे असून त्यात एकच गोलसर. सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले), फिकट जांभळट तपकिरी बी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे यूफोर्बिएसी कुलात (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पांढरे किंवा पिवळट करडे, मऊ व हलके असून त्याच्यावर रंग चांगला बसतो. वल्ही, तराफे, कोरीव व कातीव काम, खेळणी, नाटकी मुखवटे इत्यादींसाठी ते विशेषकरून वापरतात. बियांचे तेल नाजूक यंत्रांना वंगण घालण्यास उपयुक्त असते. लेखक: श्री. द. महाजन स्त्रोत: मराठी विश्वकोश