पादवेल (हिं. पाप्री, पाप्रा, बनबैगन; गु. वेनीवेल; सं. वक्रा, गिरिपर्पट; इं. इंडियन पोडोफायलम लॅ. पोडोफायलम हेक्झँड्रम किंवा पो. इमोदी; कुल-बर्बेरिडेसी). जमिनीत मूलक्षोडाच्या (जमिनीखालील आडव्या खोडाच्या) साहाय्याने वाढत जाणारी ही मांसल ⇨ औषधी काश्मिरात व हिमालयात सिक्कीम ते हझारा या प्रदेशात २,८००-४,३५० मी. पर्यंत आढळते. जमिनीवरची फांदी सरळ व तिच्यावरची पाने एकाआड एक, दोन मोठी (१५-२५ सेंमी.), ३-५ भागांत विभागलेली, दातेरी व त्यांवर जांभळे ठिपके. पाने व फुलांचा दांडा १५-४५ सेंमी. ; फुले (२.५-५ सेंमी. व्यास) पांढरी किंवा गुलाबी, पेल्यासारखी, बहुधा एकेकटी. संदले तीन, पाकळ्यांसारखी व लवकर गळून पडणारी; पाकळ्या सहा व केसरदले सहा [ → फूल] ; मृदुफळ लहान (२.५-५ सेंमी.) लांबट गोलसर, शेंदरी, मांसल, अनेक बीजी व खाद्य असते. सुक्या मूलक्षोडात पोडोफायलीन नावाचे रेझीन (१०-१२%) असते. ते तीव्र रेचक असून अधिक प्रमाणात घेतल्यास तीव्र दाह व मुरडा होतो. ते बहुधा बेलाडोना किंवा कोरफडीबरोबर मिश्रणात देतात. पोडोफायलोटॉक्सिन हाही एक मुख्य घटक असतो. मुळे व मूलक्षोड यकृताला उत्तेजक (पित्तवर्धक), रेचक आणि अनेक त्वचारोग व गुल्मवृद्धी यांवर उपयुक्त असतात. भारतात दरवर्षी सु. १०० टन पोडोफायलीन लागते; परंतु जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश व उ. प्रदेश येथून सु. ५०-८० टन इतकाच पुरवठा होतो. मे-ॲपल (पो. पेल्टॅटम) नावाची पादवेलीच्या वंशातील दूसरी अमेरिकन जाती हिमालयात (आतल्या रांगांत) ६२०-१,२४० मी. पर्यंत आढळते. तिची लागवडही करण्यात येते कारण तिचेही औषधी गुण वरच्याप्रमाणे आहेत; परंतु तिच्यातील रेझिनाचे प्रमाण फक्त ४% असते. परांडेकर, शं. आ. स्त्रोत: मराठी विश्वकोश