नागेट्टा नगेट्ट; लॅ. गॉर्डोनिया ऑब्च्यूसा; कुल-थीएसी). ह्या उंच सदापर्णी वृक्षाचा प्रसार पश्चिम घाटात कोकणापासून खाली दक्षिणेस, तमिळनाडूत, निलगिरीच्या पूर्वेस रुक्ष भागात, त्रावणकोरमध्ये व समुद्रसपाटीपासून ७५०–२,२५० मी. उंचीपर्यंत आहे. याची साल तपकिरी व गुळगुळीत असून पाने एकाआड एक, साधी, अरुंद, लांबट, गुळगुळीत व आखूड देठाची असतात. सु. ४ सेंमी. व्यासाची पांढरी फुले एकाकी व जून–सप्टेंबरात येतात. संदले पाच, प्रदले पाच व खाली किंचित जुळलेली आणि बाहेरून लवदार असतात. केसरदले असंख्य व अंशतः पंचसंघ (पाच झुबक्यांत); किंजपुट ३–५ कप्प्यांचा [→फूल]. बोंड लांबट, ३ सेंमी. व पंचकोनी; बिया चपट्या, तिरप्या व टोकास पंखधारी असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ थीएसी कुलात (चहा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुले असताना हा वृक्ष सुंदर दिसतो. याच्या पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) उत्तेजक व दीपक (भूक वाढविणारा) असतो. लाकूड कठीण, जड, लवचिक आणि तांबूस पांढरे असून सुतारकामास चांगले असते; परंतु बाक येण्याचा संभव अधिक. घरबांधणीत फळ्या, वासे व तुळ्यांसाठी वापरतात. पानांची चहात भेसळ करतात किंवा ती चहाऐवजी वापरतात. लेखक -जमदाडे, ज. वि. स्त्रोत - मराठी विश्वकोश