जलनेचे(इं. वॉटर-फर्न्स लॅ. हायड्रॉप्टेरिडेलिझ). ही संज्ञा नेचे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाच वंशांतील (मार्सिलिया, पिल्युलॅरिया, रेग्निलिडियम, सॅल्व्हिनिया वॲझोला) अबीजी व वाहिनीवंत (द्रव पदार्थांचे परिवहन करणाऱ्या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींच्या जातींना उद्देशून वापरली जाते कारण त्यांतील सर्व जाती (सु. ८७) उथळ पाण्यात वा दलदलीत वाढतात. जल-जीवनाला योग्य अशा अनुयोजना [मुख्यतः बीजुककोशांना म्हणजे प्रजोत्पादक घटक (कोशिका) निर्माण करणाऱ्या पिशवीसारख्या अवयवांना एका संरक्षित व जटिल संरचनेत काही काळ बंद करून ठेवणे] आणि लहान व मोठी अशी दोन प्रकारची बीजुके (विषमबीजुकत्व; लघुबीजुके व गुरुबीजुके) असणे ही लक्षणे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे [→ नेचे]. या दोन्ही लक्षणांना वर्गीकरणात विशेष महत्त्व देऊन ह्या पाच वंशांचा अंतर्भाव हायड्रॉप्टेरिडेलीझ ह्या स्वतंत्र गणात बहुधा करतात; परंतु अलीकडे विषमबीजुकत्व हे प्रगतिदर्शक लक्षण अनेक लहानमोठ्या गटांत आढळले असल्याने आणि तसेच परिस्थितिजन्य लक्षणेही एका वंशातील काही जातींत किंवा एका कुलातील फक्त काही वंशांत किंवा जातींतच दिसून येत असल्याने वर्गीकरणात त्यांचे महत्त्व मर्यादित मानण्यात आले आहे. ह्याशिवाय वर दिलेल्या पाच वंशांतील जातींत आणि इतर नेचांच्या जातींत कित्येक लक्षणांत साम्य आढळते. ह्या गोष्टी लक्षात घेऊन सर्व जल नेचांचा अंतर्भाव फक्त दोन कुलांत (मार्सिलिएसी व सॅल्व्हिनिएसी) करून खऱ्या नेचांमध्ये (फिलिकेलीझ गणात) ती कुले समाविष्ट करणे योग्य ठरते; तथापि जल नेचांचा अंतर्भाव बीजुककोशाभोवतीच्या संरक्षक आवरणाच्या आणि विषमबीजुकत्वाच्या आधारावर व त्यांचे आपसातील काही भेद लक्षात घेऊन दोन स्वतंत्र गणांत(मार्सिलिएलीझ व सॅल्व्हिनिएलीझ) केल्याचेही आढळते; खरे नेचे समबीजुक (लहान व मोठे असा फरक बीजुकांत नसणारे) आहेत. पुढे दिलेल्या वर्णनात ह्या दोन गणांच्या आणि त्यांतील कुलांच्या लक्षणांचा प्रमुख वंशांच्या वर्णनाद्वारे ऊहापोह केला आहे. सेरॅटॉप्टेरिस (आ. १) ह्या समबीजुक वंशांतील जलीय जातीही जल नेचे या संज्ञेत समाविष्ट व्हावयास पाहिजे, परंतु त्यांची इतर सर्व लक्षणे भिन्न असल्याने त्यांचा अंतर्भाव पार्केरिएसी ह्या स्वतंत्र कुलात करण्यात आला आहे व ते कुल इतर खऱ्या नेचांत अंतर्भूत केले आहे. जपानात या नेचाची पाने कच्ची किंवा शिजवून खातात; भात खाचरात त्याची लागवड करतात.से. थॅलिक्ट्रॉइडिस ही जाती भारतातही आढळते. जीवाश्म जल नेचांपैकी फक्त दोन (सॅल्व्हिनिया व ॲझोला) वंशांच्या जीवाश्मांनी (शिळारूप अवशेषांची) निश्चित माहिती मिळते.रोडाइटस दक्षिणी ही तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जाती भारताच्या अंतरा-ट्रॅपी थरांत (ज्वालामुखी खडकांच्या दोन जवळजवळ सपाट आडव्या थरांच्या म्हणजे ‘ट्रॅपांच्या’मध्ये असणाऱ्या गाळाच्या खडकांच्या थरांत) आढळली असून रेग्निलिडियम (मार्सिलिएसी) वंशाशी तिचे बरेच साम्य दिसते, असे सहानी व राव (१९४३) यांनी सिद्ध केले आहे. त्याच खडकांच्या थरांत (मध्य प्रदेश) सॅल्व्हिनियाचे व ॲझोलाचे जीवाश्म सापडले आहेत.सॅ. इंटरट्रॅपिया हे नाव त्या जातीच्या लघु-व गुरु-बीजुकांच्या जीवाश्मांवरून दिले आहे (महाबळे, १९५०); ॲ. इंटरट्रॅपिया हे नाव त्या नेचाच्या सर्व विखुरलेल्या अवयवांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावर आधारले आहे (सहानी व राव, १९४३). सॅल्व्हिनियाची तरंगणारी पाने संपीडित (दबलेल्या) अवस्थेत (जीवाश्मांचा एक प्रकार) ऑस्ट्रेलियाखेरीज इतर खंडात सापडली आहेत व ती सर्व तृतीय कल्पातील आहेत. नवजीव महाकल्पापूर्वीच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कोणत्याही जल नेचाच्या वंशाचे जीवाश्म आढळलेले नाहीत. स्त्रोत: मराठी विश्वकोश