जट्रोफा पोडॅग्रिका (इं. ग्वातेमाला ह्यूबर्ब; कुल-युफोर्बिएसी). उष्ण कटिबंधामध्ये सर्वत्र बागेत आढळणाऱ्या या लहान क्षुपाचे (झुडपांचे) मूलस्थान न्यू ग्रॅनडा आहे. याचे खोड फुगीर, पाने मोठी, छत्राकृती व फुले लहान व लालभडक असून ती ऑगस्ट ते ऑक्टोबरात येतात. सामान्य संरचना यूफोर्बिएसी अथवा एरंड कुलात वर्णिल्याप्रमाणे. ती एकलिंगी असून संवर्त पेल्यासारखा, पंचदलीप्रदले लाल व पाच; केसरदले सहा ते आठ; तंतू लाल, बिंब पिवळे व पाच प्रपिंडांचे (ग्रंथींचे) असते. किंजपुट बिंबावर टेकलेला असून किंजल आखूड व किंजल्काच्या अनेक हिरव्या शाखा असतात फुल बोंड हिरवे व तीन कप्प्यांचे असते. नवीन लागवड बी व फांद्यांनी करता येते. हे शोभेकरिताच लावतात. (चित्रपत्र). जमदाडे, ज. वि. स्त्रोत: मराठी विश्वकोश