चंदनबटवा (सुरका; इं. गार्डन ओरॅक, मौंटन स्पिनॅक, सी-पर्स्लेन; लॅ. ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस कुल-चिनोपोडिएसी). सु. अर्धा मी. उंचीची ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी हिरवी पिवळट किंवा लालसर असते; या झाडाला कापरासारखा वास येतो; खोडावर बारीक खोबणी असतात; पाने एकाआड एक व साधी; खालची किंचित त्रिकोणी व शेंड्याकडची लांबट; खालची बाजू जांभळट पिंगट आणि कडा साधारण दातेरी; फुलोरा माठाप्रमाणे कणिशांची परिमंजरी; फुले लहान द्विलिंगी व एकलिंगी प्रदलहीन, हिरवट किंवा लालसर असून ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये येतात. काहींत परिदले ३-५ व छदहीन, काहींत फक्त दोनच छदे. केसरदले ३-५ [⟶ फूल]; सर्वसाधारण लक्षणे चिनोपोडिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; हिचे मूलस्थान आशिया आहे, पण यापेक्षा अधिक माहिती नाही. बियांतील पूड अ जीवनसत्त्वाभावी देतात. ही वनस्पती पालेभाजीकरिता उपयोगात आहे. संग्रहणी, मूळव्याध या विकारांवर व कृमिनाशक म्हणून उपयुक्त आहे. भारतामध्ये ही काश्मीर, पं. बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात लावतात. या पिकाला मध्यम काळी जमीन मानवते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २० — २५ टन शेणखत घालून, कुळवून ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात आणि त्यांत हेक्टरी ४·५ किग्रॅ. बी फेकतात, मातीत मिसळतात व पाणी देतात. बी पेरल्यापासून ४ — ५ आठवड्यांत पीक विक्रीसाठी काढतात. हेक्टरी ४,००० ते ५,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते. पाटील, ह. चिं. स्त्रोत: मराठी विश्वकोश