खोकली : (१) पाने व फुलोऱ्यासह फांदी, (२) पुं-पुष्प, (३) स्त्री-पुष्प खोकली (हि. खोकली, कुपी; गु. वंधी कांतो; क. कुप्पी-गिड; सं. हरितमंजरी; लॅ. अॅकॅलिफा इंडिका; कुल-यूफोर्बिएसी). या वर्षांयू (एक वर्ष जगणाऱ्या) व ३०–७५ सेंमी. उंच ओषधीचा [→ ओषधी] प्रसार श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, फिलिपीन्स, भारत इ. प्रदेशांत सर्वत्र आहे. ओसाड जागी किंवा पिकांमध्ये ती तण म्हणून उगवते. फांद्या लांब व कोनीय; पाने साधी, अंडाकृती, दंतुर व तीन मुख्य शिरांची. जून–सप्टेंबरात एकलिंगी फुले एकाच झाडावर पानांच्या बगलेतील लांबट उभ्या कणिशावर येतात. पुं-पुष्पे लहान व शेंड्याकडे झुबक्यात आणि स्त्री-पुष्पे विखुरलेली, ३–५ व पानासारख्या छदाने (ज्याच्या बगलेत फुले वा फुलोरे येतात अशा पानाने) वेढलेली असतात. बोंड लहान व एकबीजी असते. खोकली कफोत्सारक (कफ पातळ करणारी) व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून श्वासनलिकेचा दाह, दमा, फुप्फुसाचे विकार व संधिवात यांवर गुणकारी असते. मुळांचा काढा विरेचक (तीव्र रेचक); पाने त्वचारोगावर वाटून किंवा रस काढून लावतात; रस वांती होण्यास देतात. या झाडात अॅकॅलिफीन हे द्रव्य असते. लेखक: ज. वि. जमदाडे स्त्रोत: मराठी विश्वकोश