कुंती-१ (हिं. कामिनी, जुती, मार्चुला; क. अंगारकन गिड, पांद्री; इं. सॅटिन-वुड; लॅ. मुराया पॅनिक्युलॅटा; कुल-रूटेसी). सु. ४.५—७.५ मी. उंचीचा हा लहान शोभिवंत वृक्ष हिमालयाच्या परिसरात यमुना ते आसाम, बिहार व पश्चिम भारत; ब्रह्मदेश, श्रीलंका, चीन, अंदमान, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक बेटे इ. प्रदेशांत आढळतो; शिवाय हल्ली बागेतही लावतात. साल पातळ व करडी; पाने संयुक्त, विषमदली पिच्छाकृती (पिसासारखी); दले तीन ते नऊ, चकचकीत, बहुधा टोकास खाचदार; फुले घंटाकृती, पांढरी, सुगंधी, मध्यम आकाराची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, गुलुच्छ फुलोऱ्यात [ → पुष्पबंध], विशेषत: मे—सप्टेंबरमध्ये येतात. संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ रूटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदुफळ लाल, लांबट व एक – दोन बियांचे असते. लाकूड ‘चायनीज बॉक्सवुड’ म्हणून प्रसिद्ध आहे. पिवळट रंग, कठिनता व विशिष्ट संरचनेमुळे कापण्यास सोपे असून हत्यारांचे दांडे, कपाटे, काठ्या, मोजणीची (गणिती) उपकरणे, कोरीव काम इत्यादींसाठी चांगले; सुवासिक साल सुगंधी प्रसाधने बनविताना वापरतात. मुळाच्या सालीचे चूर्ण अंगदुखीवर चोळण्यास व पोटात घेण्यास उपयुक्त; पानांचे चूर्ण कापलेल्या जागी लावतात; पानांचा काढा जलशोफावर (द्रवयुक्त सूजेवर) प्यावयास देतात. पाने उत्तेजक, स्तंभक (आकुंचन करणारी), आमांश, अतिसार इत्यादींवर गुणकारी. कुंतीचे तीन भिन्न प्रकार आहेत. लेखक: ठोंबरे, म. वा. स्त्रोत: मराठी विश्वकोश