(हिं. किरमाला; सं. गंधा; इं. सँटोनिका, वर्मसीड; लॅ. आर्टेमिसिया मॅरिटिमा; कुल-कंपॉझिटी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), केसाळ ओषधी [ओषधि] इंग्लंड ते मंगोलिया, पश्चिम हिमालय, तिबेट, बलुचिस्तान इ. प्रदेशांमध्ये आढळते. खोड १५—४५ सेंमी. उंच पण कधी थोडेफार आडवे वाढते. पाने पाच सेंमी. लांब, बहुधा पांढरट, लंबगोल, संयुक्त व पिसासारखी; फुले लहान, थोडी, लालसर व स्तबके आखूड कणिशावर येतात [कंपॉझिटी]. फुलातून सँटोनीन नावाचे जंतनाशक द्रव्य मिळते, ते रेचक व दीपक (भूक वाढविणारे) आहे. सूज व जखमांवर वनस्पतीचा शेक देतात. यावरून इंग्रजी नाव सार्थ आहे.

आर्टेमिसिया सिना : (इं. लेवांट वर्मसीड प्लँट). ही त्याच वंशातील ओषधी सँटोनीन द्रव्याबद्दल शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. ती पश्चिम आशियाकडील (इराण व तुर्कस्तान) असून यूरोपमध्ये तिचा प्रसार प्रथम धर्मगुरूंनी केला. हिची फुले पिवळट असतात. रशियात व प. अमेरिकेत तिची लागवड केली जाते.

लेखिका : पुष्पलता द. आफळे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश