कासोदा (रानकासविंदा, रानटाकळा, कासिवदा; हिं. कासोंदा; गु. कासुंदरी; क. दोट्टा तगसे; सं. अरिमर्दा, कासारी, कासमर्दा; इं. नीग्रो कॉफी, स्टिंकिंग वीड; लॅ.कॅसिया ऑक्सिडेंटॅलिस; कुललेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). हे वर्षायू क्षुप (एक वर्ष जगणारे झुडूप) भारतात आणि उष्णकटिबंधात सर्वत्र आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे याचा वंशातील तरवड, बाहवा, टाकळा यांच्याप्रमाणे व त्यांच्या कुलात [→ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे. खोड ०.६-१.५ मी. उंच; फांद्या जांभळट व त्यावर खोलगट रेषा; सोपपर्ण (उपपर्णयुक्त) पाने १५-२० सेंमी. लांब, संयुक्त व पिसासारखी; दले ३-५ जोड्या; फुले लहान व पिवळी; त्यातील पाच पाकळ्यांवर नारिंगी रेषा असून ती पानांच्या बगलेत व फांद्यांच्या टोकास, परिमंजऱ्यासारख्या फुलोऱ्यावर जानेवारी-मार्चमध्ये येतात. केसरदलांपैकी तीन वंध्य, तीन लांब व चार आखूड असतात [→ फूल]. शिंबा (शेंग) चपटी, १०-१२ x ८ सेंमी. व गाठाळ; बिया १५-३०, हिरवट, कठीण, गुळगुळीत व परस्परांपासून पडद्यांनी अलग झालेल्या असतात. सर्व भाग मूत्रल (लघवी साफ करणारे), रेचक, पौष्टिक व ज्वरनाशक. पानांचा व बियांचा उपयोग पाळीच्या तापावर व त्वचारोगांवर करतात. पाने चुरगळल्यावर घाण वास येतो; त्यावरून इंग्रजी नाव पडले, तसेच भाजलेल्या बियांची पूड कॉफीऐवजी वापरतात म्हणून नीग्रो कॉफी म्हणतात. कोकणात मुलांच्या आकडीवर बियांचा उपयोग करतात. दुष्काळात पाने भाजीकरिता वापरतात. लेखक: शं. आ. परांडेकर स्त्रोत: मराठी विश्वकोश