कामट्टी (लॅ. बैल्श्मीदिया फॅगिफोलिया; कुल – लॉरेनी). सु. 6-9 मी. उंच वाढणाऱ्या एका वृक्षाचे कानडी नाव. या मोठ्या सदापर्णी वृक्षाचा प्रसार सर्व उष्णकटीबंधात आहे. भारतात (दख्खन द्वीपकल्प, कोकण, उत्तर कारवार) सदापर्णी जंगलात तो आढळतो. बुंध्याचा घेर 1.2 मी.; साल पातळ, करडी व खवलेदार; पाने चिवट, दीर्घवृत्ताकृती – भाल्यासारखी, गुळगुळीत, टोकदार असून वरची बाजू चकचकीत व खालच्या बाजूस शिरांचे जाळे स्पष्ट दिसते. फुले पांढरट व कथाक्ष्य (बगलेतील) आखूड परिमंजरीवर (→ पुष्पबंध) थंडीत येतात. फळे तीन ते चार सेंमी. लांब, बोरासारखी, गडद निळी असून उन्हाळ्यात येतात. लाकूड फिकट तपकिरी, चमकदार व मध्यम कठीण असते; घरे व नावांसाठी ते वापरतात. लेखक: ज. वि. जमदाडे स्त्रोत: मराठी विश्वकोश