काँजिया टोमेंटोजा (कुल-व्हर्विनेसी). की एक मोठी प्रतानारोही (तनाव्यांच्या साहाय्याने वर चढणारी) वेल मूळची ब्रम्हदेश, थायलंड, आसाम इ. प्रदेशांतील असून उत्तर भारतात बरीच लागवडीत आहे; शोभेकरिता महाराष्ट्रातही बागेत लावलेली आढळते. अॅझूरिया नावाचा प्रकार महाराष्ट्रात विशेष लावतात; उत्तर भारतातऑब्लॉंगीफोलिया हा प्रकारही अधिक आढळतो. नावाप्रमाणे टोमेंटोजा प्रकार अधिक लवदार असतो. याची पाने संमुख (समोरासमोर), आयत, १०-१२ X ५-१० सेंमी., वरून खरबरीत, खालून केसाळ व उठावदार शिरांची; या वेलीची निळसर पांढरी, लहान फुले केसाळ व अग्रस्थ (शेंड्यावरील) परिमंजरीवर जानेवारी-मेमध्ये येतात. छदे व छदके मोठी; प्रत्येक वल्लरीखाली तीन छदकांचे व वाटीसारखे फिकट लाल वा निळे मंडल असते. संवर्त नसराळ्यासारखा; पुष्पमुकुट नलिकाकृती [फूल]. इतर लक्षणे व्हर्बिनेसीकुलात वर्णिल्याप्रमाणे; बोंड तडकत नाही. बिया व कांड्या यांपासून नवीन लागवड करतात. लेखक: द. सी. चौगले स्त्रोत: मराठी विश्वकोश