कसीली (करंडी; लॅ. अॅब्युटिलॉन म्युटिकम; कुल-माल्व्हेसी). कापूस, जास्वंद, व भेंडी यांच्या कुलातील या लहान केसाळ झुडपाचे ⇨मुद्रा व ⇨चिनी ताग ह्यांच्याशी बरेच साम्य असून ते पाकिस्तानात आणि भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते; तथापि कोकणात व दक्षिण पठारावर कोठेही रस्त्याच्या कडेने किंवा कचऱ्याच्या ढिगावरही आढळते. पाने साधी (७.५-१० सेंमी. व्यासाची) लांब देठाची, गोलसर, हृदयाकृती, दातेरी व सोपपर्ण (उपपर्णासह); फुले लालसरपिवळी, मुद्रेच्या फुलांपेक्षा मोठी, पानांच्या बगलेत एकेकटी, जानेवारी-जूनमध्ये येतात. किंजदले सु.पंचवीस [→ फूल]; फळ (बोंड) साधारण गोलसर, टोकास खोलगट, फारच केसाळ; प्रत्येक किंजदलात तीन लवदार बिया. खोड व फांद्यांपासून उपयुक्त धागे काढून त्यांपासून साध्या दोऱ्या व तत्सम वस्तू बनवितात. बिया पौष्टिक असल्याने दुष्काळात त्यांची पूड ज्वारीच्या पिठात मिसळून भाकरी करतात किंवा बियांची कांजी करून पितात. लेखक: शं. आ. परांडेकर स्त्रोत: मराठी विश्वकोश