(हिं. अजगंधा; गु. धोळी सादोडी; क. नइतुलसी; इं. गोट वीड, आपाग्रास; लॅ. अॅजिरॅटम कॉनिझॉइडीस; कुल-कंपॉझिटी). सु. ३०—६० सेंमी. उंचीची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी श्रीलंकेत, भारतात व उष्णकटिबंधात इतरत्र १,५५० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत तणाप्रमाणे सर्वत्र आढळते. खोड हिरवट, कधी जांभळट, केसाळ, उभे व शाखायुक्त; पाने साधी, संमुख (समोरासमोर) किंवा फक्त वरची एकाआड एक, ५—७ × २·५—५ सेंमी., अंडाकृती, दातेरी, केसाळ; फुलोरा अनेक स्तबकांचा गुलुच्छ [ पुष्पबंध] टोकास नोव्हेंबर-मार्चमध्ये येतो. फुले लहान, एकाच प्रकारची, द्विलिंगी, नलिकाकृती. फिकट निळसर ते पांढरी, कुबट वासाची; छदे रेषाकृती, टोकदार व रेषांकित; पाच पिच्छ-संदले, खवल्यासारखी [फूल]; कृत्स्न फळे (शुष्क, आपोआप न फुटणारी, व बाह्य आवरणापासून अलग असलेले एकच बीज असणारी, फळे) बारीक व काळी.

ओसाडी : (१) फांदी, (२) फुलोरा (स्तबक), (३) फूल, (४) फळ (संवर्तासह), (५) किंजपुटाचा उभा छेद.ओसाडी : (१) फांदी, (२) फुलोरा (स्तबक), (३) फूल, (४) फळ (संवर्तासह), (५) किंजपुटाचा उभा छेद.

या वनस्पतीचा फांट (काढा) अतिसार व शूल यांवर देतात. रस गुदभ्रंशावर उपयुक्त. पाने वांतिकारक. पाने व खोडाचे गरम पोटीस कुष्ठ व इतर त्वचारोगांवर लावतात; गर्भाशयाच्या विकारांवर बाहेरून लावण्यास चांगले. पाने धनुर्वातरोधक व रक्तस्त्रावरोधक; मुळांचा रस अश्मरी (खडा ) तयार होऊ नये यासाठी वापरतात. पाने व फुलांपासून०·०२ टक्के दुर्गंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश