(बागुळी; हिं. कोकरे; क. मर्सद; सं. श्वेतघातकी; लॅ. कॅलिकॉप्टेरिस फ्लोरिबंडा, कुल-काँब्रेटेसी). सु. १-२ मी. उंचीचे हे झुडूप सह्याद्रीवर विपुल आढळते; शिवाय द. भारत, मध्य प्रदेश, ओरिसा, आसाम तसेच चित्तगाव, मलाया इत्यादींतील पानझडी जंगलांतही सापडते. सर्वांगावर केस; पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती, भाल्यासारखी टोकदार, खाली काहीशी तांबूस व खाचदार; फुले फिकट व पिवळट हिरवी असून फांद्यांच्या शेंड्यावर परिमंजरीत मार्च-मेमध्ये येतात. छदे केसाळ व हिरवट; संवर्तनलिका काहीशी भोवर्यासारखी व अधःस्थ किंजपुटावर सतत वाढत राहते [फूल]; ती एकबीजी व पंचधारी फळावर ठळकपणे दिसते. पाकळ्या नसतात. संदले पाच, केसरदले दहा व किंजपुटात बीजके तीन [काँब्रेटेसी].

उक्षीची पाने कडू, स्तंभक (आकुंचन करणारी), कृमिनाशक व पोटदुखीवर सारक म्हणून देतात. पानांची भुकटी हिवताप व आमांशावर लोण्याबरोबर देतात व तसेच ती व्रणांवर लावतात. फळांची राख तेलात घालून अग्निदग्ध व्रणावर लावतात.

लेखक : शं. आ. परांढेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश