(इं. आर्निका, मौंटन टोबॅको; कुल - कंपॉझिटी). सु. ०·३ मी. उंचीची ही लहान बहुवर्षायु (पुष्कळ वर्षे जगणारी) ओषधी मूळची उत्तर अमेरिका, आशिया, यूरोप येथील आहे. हिचे मूलक्षोड खोड बारीक, चिवट व तपकिरी रंगाचे असून त्याला खाली मुळे व जमिनीवर बिनदेठाच्या, रुंदट भाल्यासारख्या गुळगुळीत, अखंड पानांचा गुच्छ असतो. हिचा पिवळा स्तबक [ कंपॉझिटी] फुलोरा लांब केसाळ दांड्यावर येतो. सुके स्तबक, मूलक्षोड आणि मुळे औषधी असून ठेचलेल्या, लचकलेल्या व खरचटलेल्या भागांवर बाहेरून मद्यार्कातून लावतात. वनस्पतीचे वरील भाग शक्तिवर्धक, जखम भरून काढणारे व क्षोभकारक आहेत. या वनस्पतीत आर्निसीन नावाचे कटुद्रव्य व शेकडा ०·५ बाष्पशील तेल असते. आर्निका-मद्यार्क शरीरात टोचल्यास प्रथम रक्तदाब कमी होतो परंतु नंतर बराच वाढतो. ही ओषधी उत्तेजक, शामक व सूज उतरविणारी आहे. ती बागेत शोभेकरिता वाफ्याच्या कडेने लावतात.

लेखिका : पुष्पलता द आफळे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश