(आळीव; हिं. हलीम; गु. असालिओ; क. आळिवे, अळ्ळीबीज, कुरूतिगे; सं. अहालिंब, आहवली, अशालिका, चंद्रिका; इं. गार्डन क्रेस; लॅ. लोपिडियम सॅटिव्हम, कुल—क्रुसिफेरी). सुमारे १४-१५ सेंमी. उंचीची लहान, गुळगुळीत वर्षायू (वर्षभर जगणारी) ओषधी. मूळची ईथिओपियातील व इरिट्रीयातील उंच प्रदेशातून यूरोप व प. आशियात आणली गेली. भारतात सर्वत्र लागवड केली जाते. पाने साधी, विविध, पूर्णत: किंवा अंशत: अखंड किंवा पूर्णपणे विभागलेली; मूलज (मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी) पाने लांब देठाची, स्कंधोद्भव (खोडापासून निघालेली) पाने बिनदेठाची, रेषाकृती [पान]. फुले लहान व पांढरी असून लांबट मंजरीवर येतात. शुक फळ (सार्षप) लहान, गोलसर-अंडाकृती, टोकास खाचदार, सपक्ष, प्रत्येक कप्प्यात एकच बी. इतर सामान्य शारीरिक लक्षणे कुसिफेरी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

ही वनस्पती सर्वकाळी व सर्वत्र पिकविली जाते. सखल भागात सप्टेंबरमध्ये बी पेरतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत पाने कोशिंबिरीत किंवा कढीत (सार) घालण्यास खुडून घेतात. बियांकरिता ४-६ आठवडे लागतात. पाला घोड्यांना व उंटांना चारा म्हणून घालतात. दमा, कफ व रक्ती मूळव्याध इत्यादींवर ही ओषधी गुणकारी आहे. पाने उत्तेजक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व यकृताच्या विकारावर चांगली. याचे मूळ उपदंशावर देतात. बिया चर्मरक्तकर (त्वचेला लाली आणणाऱ्या), दुग्धवर्धक, आर्तवजनक (विटाळ सुरू करणाऱ्या), रेचक, शक्तिवर्धक, कामोत्तेजक व मूत्रल असून मुडपणे, दुखापत इत्यादींवर त्याचे पोटीस बांधतात. बियांचे तेल (२५·५ टक्के) सावकाश सुकणारे, पिंगट व पिवळसर रंगाचे असून त्यास विचित्र दुर्गंध येतो. त्याचा जळणासाठी व साबणासाठी उपयोग करतात.

लेखक : व. ग. क्षीरसागर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश