(कंचुकी; हिं. असगंध; गु. असोदा; क. अमंगुरा; सं. अश्वगंधा; इं. विंटरचेरी; लॅ. विथानिया सोम्निफेरा, कुल–सोलॅनेसी). सुमारे ०·३–१·५ मी. उंचीचे हे लहान झुडूप भारतात रुक्ष ठिकाणी आढळते; शिवाय श्रीलंका, सिंध, भूमध्यसामुद्रिक विभाग इ. प्रदेशांतही सापडते. फांद्या अनेक व त्यांवर तारकाकृती केस असतात. अश्वगंधा : पाने, फुले व फळे असलेली फांदी. (१) फुले, (२) फळे. अश्वगंधा : पाने, फुले व फळे असलेली फांदी. (१) फुले, (२) फळे. पाने साधी, अंडाकृती (५–१० X २·५–५ सेंमी.), लवदार; पाच हिरवट-पिवळसर, लहान फुलांचा झुबका (चामराकृती वल्लरी, पुष्पवंध); फुलांची संरचना सामान्यत: सोलॅनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे : मुदुफळ लाल, सु. ६ मिमी. व्यासाचे फुगीर, संवर्ताने वेढलेले [फूल]; बी पिवळे; मूळ कामोत्तेजक, आरोग्य पुन:स्थापक, पौष्टिक, मूत्रल, गुंगी आणणारे, रेचक; क्षय, संधिवात, अशक्तपणा इ. निवारक; पाने कडू, ज्वरनाशक; गळू, सूज वगैरेंवर मुळांचे पीठ व पानांचा चोथा लावतात. लेखक : रा. ना जोशी माहिती स्रोत : मराठी विश्वकोश