फुलझाडांच्या [ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गात या कुलाचा समावेश असून बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरणपद्धतीप्रमाणे याला गणाचा दर्जा आहे व त्यात कॅनाबिनी, उल्मी, अर्टिकी, मोरी इ. सात उपगण अंतर्भूत आहेत. एंग्लर व प्रांट्ल यांच्या मते अर्टिकेलीझ या गणात अर्टिकेसी, उल्मेसी, मोरेसी व कॅनाबिनेसी या चार कुलांचा समावेश व्हावा; याला अनुसरून अर्टिकेसी कुलात सु. ४१ वंश व ४८० जाती आहेत. या वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत आहे. यात चीक नसतो. पाने साधी, सोपपर्ण [पान] फुले लहान, एकलिंगी, नियमित व फुलोरे वल्लरी किंवा नतकणिश प्रकारचे [ पुष्पबंध]; परिदले ४ (बहुधा २ + २) क्वचित ५, सुटी किंवा जुळलेली, संदलासारखी; केसरदले तितकीच व परिदलसंमुख, कलिकावस्थेत आत वळलेली व पक्क झाल्यावर एकदम सरळ होऊन पराग उधळणारी. किंजपुट ऊर्ध्वस्थ; एकाच कप्प्यात एक ऊर्ध्वमुख बीजक असते. कुंचल्यासारखा किंजल्क एकाच किंजलावर असतो [फूल]. कृत्स्नफल (शुष्क व एकबीजी) बहुधा सतत राहणाऱ्या परिदलाने वेढलेले; बीजातील पुष्क (विकासावस्थेतील बीजाच्या पोषणास मदत करणारा एक भाग, बी) तैलयुक्त व गर्भ सरळ असतो. या कुलातील आग्या व मोठी खाजोटी या वनस्पतींना दाहक केस असतात. रॅमी व बनऱ्हीया ह्यांपासून उत्तम धागा मिळतो. पायलिया मायक्रोफिला ही वनस्पती बागेतील लोंबत्या कुंड्यांत शोभेकरिता लावतात.

लेखक : वि. रा. ज्ञानसागर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश