(तुपा, वरसिंगी; क. रायभोटे, हनिगिगरी, हुण्णगेरे, येल्लाळ; लॅ. कथियम डायडिमम, कुल–रुबिएसी). हा लहान शोभिवंत सदापर्णी वृक्ष (किंवा मोठे क्षुप म्हणजे झुडूप) भारतात सर्वत्र (मुख्यतः कोकण व कारवारच्या सदापर्णी जंगलात व नदीकिनारी) व श्रीलंकेमध्ये आढळतो. ह्याची उंची ९-१५ मी.; फांद्या चौकोनी व साल गर्द करडी व गुळगुळीत; पाने ५–१५ X ५–१० सेंमी. लांबट, गोल, समोरासमोर, विविध आकृतीची व चिवट; उपपर्णे (देठाच्या तळाशी असलेली उपांगे) त्रिकोनी; फुले पंचभागी, पांढरी, सुवासिक, पानांच्या बगलेत चवरीसारख्या फुलोऱ्यात नोव्हेंबर–जानेवारीत येतात. फळ अश्मगर्भी (कोय असलेले), चपटे, आयत, लहान, जवळजवळ द्विभक्त, पक्क झाल्यावर काळे व चकचकीत; आठळी व बिया १–२, सपुष्क; इतर सामान्य लक्षणे रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. लाकूड कठीण; घोगर व खुरपेंद्राप्रमाणे कातीव व कोरीव कामास चांगले; शेतीची अवजारेही करतात. साल ज्वरनाशक म्हणून वापरतात; तिच्या चूर्णाचा लेप हाड मोडल्यास लावतात.

लेखक : कमला श्री. हार्डीकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश