(हिं. प्रियदर्श; क. अव्वोलिगा; सं. अम्लान, महासहा; लॅ. क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस, क्रॉ. अंड्युलिफोलिया; कुल–अॅकँथेसी). हे कोरांटीसारखे क्षुप (झुडूप) सु. ६० सेंमी. उंच, लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून मूळचे श्रीलंकेमधील आहे. मलायात व भारतात (उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व पश्चिम द्वीपकल्प) शोभेकरिता लावतात. पाने साधी, समोरासमोर, कडा तरंगित (त्यावरून एक जातिवाचक लॅटिन नाव); फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा कणिस व त्यावर लांबट हिरव्या व केसाळ छंदाच्या बगलेत सुंदर, नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी (अबोली) फुले येतात [पुष्पबंध; फूल]. इतर रंगांची फुले असलेले प्रकारही आढळतात. शुष्क फळात चार बिया असतात.

ही वनस्पती कडू, उष्ण, सौंदर्यकारक व कामोत्तेजक आहे. मुळी दुधात शिजवून पांढऱ्या धुपणीवर औषध म्हणून पिण्यास देतात.

लागवड : बियांपासून रोपे करून अगर खोडाचे फाटे लावून लागवड करतात. जमीन खणून, खत घालून ६०-७५ सेंमी. अंतराने पाडलेल्या सरीच्या बाजूला ६० सेंमी. अंतराने पावसाळ्यात रोपे लावतात. झाडांना एकामागून एक असे सारखे बहार वर्षभर येत असतात, परंतु ऑक्टोबर-जानेवारीच्या दरम्यान जास्तीतजास्त फुले येतात. फुलांच्या वेण्यांना मुंबई व सर्व कोकणभागांत फार मागणी असते. झाडांना वर्षायू झाडांप्रमाणे मशागत व खतपाणी दिल्यास जोम येऊन उत्तम बहार येतो.

रोग : पानावरील 'खार' हा रोग कोलेटॉट्रिकम क्रॉसेंड्राय कवकामुळे [कवक]होतो. त्यामुळे पानांवर व कडांवर अनियमित आकाराचे फिकट पिंगट डाग पडतात. ते एकमेकांत मिसळल्यानेð करपा होतो. रोगट पाने गळतात. कवकबीजाणूंचा प्रसार वाऱ्याने होऊन रोगप्रसार होतो. बोर्डो मिश्रणासारखी (३ : ३ : ५०) कवकनाशके प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात.

लेखक : कुलकर्णी, य. स. पाटील, शा. दा. चौधरी, रा. मो.

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश