(इं. स्नॅपड्रॅगॉन; लॅ. अँटिऱ्हायनम मॅजुस, कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ही बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणारी) ओषधी मूळची भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून भारतात सु. १,३९५ मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात तिची बागेत शोभेकरिता वर्षायू (एक वर्ष जगणारी) म्हणून लागवड करितात. पाने समोरासमोर, अंडाकृती, भाल्यासारखी टोकदार व अखंड; फुले मोठी (जानेवारी-एप्रिल) शेंड्याकडे कणिशावर किंवा मंजरीवर [पुष्पबंध] येतात; ती विविध रंगांची (पिवळी, गुलाबी, लाल, पांढरी, निळी इ.) असून खुज्या किंवा उंच प्रकारच्या खोडांवर येतात. पुष्पमुकुट द्वयोष्ठक (बद्धओष्ठी, मिटलेल्या बोंडाप्रमाणे; बहार सामान्यतः हिवाळ्याच्या शेवटापासून उन्हाळाभर असतो; बोंडे छिद्रांनी तडकतात; बिया अनेक; नवीन लागवड बियांपासून करतात. भरपूर खतावलेली जमीन, दोन बियांत सु. ४० सेंमी. अंतर व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

लेखक : ज. वि. जमदाडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश