फुलझाडांपैकी पॉप्लर या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या व पॉप्यूलस या लॅटिन नावाच्या वंशात[ सॅलिकेसी ] समाविष्ट असलेल्या काही पानझडी शोभिवंत वृक्षांना ‘अॅस्पेन’या इंग्रजी नावाने ओळखतात. यांच्या पानांचे देठ दुर्बल व बाजुंनी सपाट असल्याने ती बहुधा वाऱ्याने थरथरतात पॉ. ट्रेम्युलॉइड्स (क्वेकिंग अॅस्पेन) , पॉ. ट्रेन्युला (यूरोपीय अॅस्पेन) व पॉ. ग्रँडिडेंटॅटा (बिगटूथ्ड अॅस्पेन) यांचा त्यात समावेश होतो. यांचा प्रसार यूरोपात, आशियात व अमेरिकेत आहे. भारतात पॉप्यूलस वंशातील आठ जाती आढळतात, परंतु अॅस्पेन म्हणता येईल अशी जाती आढळत नाही.

अमेरिकन अॅस्पेन (क्वेकिंग अॅस्पेन) हा अमेरिकेतील महत्त्वाचा व जलद वाढणारा वृक्ष असून त्याची जास्तीत जास्त उंची २८ मी. पर्यंत जाते. पाने गोलसर, एकाआड एक, लहान व दातेरी; हिवाळी कळ्या टोकदार व चकचकीत; फुले एकलिंगी, विभक्त झाडांवर व लोंबत्या कणिशांवर येतात. बोंड तडकल्यावर चार शकले होतात व केसाळ बिया बाहेर पडतात. याचे नरम व पांढरे लाकूड कागदाचा लगदा, आगपेट्यांची खोकी, आगकाड्या इत्यादींस उपयुक्त असते. साल मूत्रल (मूत्रवर्धक), पौष्टिक व उत्तेजक असते. बिगटूथ्ड अॅस्पेनचे लाकूडही वरीलप्रमाणेच उपयुक्त आहे. यूरोपीय अॅस्पेनचे लाकूड सिगारच्या पेट्या, तोफेच्या दारूचा कोळसा, आगगाडीच्या डब्यातील तावदाने इत्यादींकरिता वापरतात.

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश