पोरीफेरा (छिद्री संघ). बहुकोशिक अपृष्ठवंशी (ज्याचे शरीर अनेक कोशिकांचे-पेशींचे-बनलेले आहे व ज्यांना पाठीचा कणा नाही अशा) प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो व सु. ५,००० जातींचे वर्णन उपलब्ध आहे. बहुकोशिक प्राण्यांमध्ये स्पंज निकृष्ट दर्जाचे आहेत, बहुतेक समुद्री आहेत; पण स्पंजिलिडी कुलातील जाती गोड्या पा ण्यात राहतात. समुद्रात ओहोटी रेषेपासून सु. ५·६ किमी. खोलीपर्यंत ते आढळतात व खडकांना किंवा इतर पदार्थांना कायमचे चिकटलेले असतात. स्पंज विविध आकारांचे व आकारमानांचे असतात, ते नळकांड्यासारखे, पापुद्र्यासारखे वाटोळे किंवा शाखित असतात. त्यांचा व्यास एक मिमी.पासून दोन मी.पर्यंत असतो. स्पंज सामान्यतः भुऱ्या रंगाचे असतात; पण तांबड्या, निळ्या, पिवळ्या, काळ्या वैगेरे रंगांचेही ते असतात. काही निवही (वसाहत करून राहणाऱ्या) कशाभिक (जीवद्रव्याचा दोऱ्यासारखा विस्तार होऊन तयार झालेली संरचना–म्हणजे कशाभिका–असलेल्या) प्रोटोझोआंशी स्पंजांचे साम्य आहे. स्पंज बहुकोशिक असून त्यात ऊतकनिर्मितीची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या निर्मितीची) चिन्हे आढळ्तात. क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) क्रियेत सुरुवातीला केव्हा तरी हे प्राणी इतर बहुकोशिकांपासून अलग पडून आदिम (आद्य) अवस्थेतच राहिले, म्हणून त्यांचा पॅरॅझोआ हा निराळा समूह करण्यात आला. पॅरॅझोआमध्ये स्पंजांचा पोरीफेरा हा एकच संघ आहे. शरीररचना साधा स्पंज (ल्यूकोसोलेनिया) हा उभ्या नळकांड्यांचा लहान समूह असून ती बुडाशी आडव्या नळ्यांनी जोडलेली असतात. नळकांड्यात एक मध्य गुहा (जठर गुहा) आणि त्याच्या टोकावर मोठे छिद्र (आस्यक) असते. देहभित्तीत तीन स्तर असतात : चपट्या कोशि कांची बाह्यत्वचा; हिच्या आत श्लेषी (बुळबुळीत) मेझेंकाईम-स्तर (बाह्य स्तर व अंतःस्तर यांच्यामध्ये असणारा ऊतकांचा पुंज) आणि याच्या आत, मध्य गुहेला लागून असणारा कशाभिक ग्रैवेय कोशिकांचा (कशाभिकेच्या तळाभोवती कॉलरसारखे कडे असलेल्या कोशिकांचा) स्तर. मेझेंकाइममध्ये कित्येक प्रकारच्या मुक्त अमीबीय कोशिका (मुक्तपणे भ्रमण करणाऱ्या व विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या) आणि देहभित्तीला मजबुती आणणाऱ्या कॅल्शियमी कंटिका (बारीक काटे) असतात. काही कंटिका बारीक शलाकेसारख्या (एकार)असतात, तर इतर काही त्रिअरी (तीन अर असलेल्या) व समचतुररही (चार अर असलेल्या) असतात. जटिल (गुंतागुंती ची संरचना असलेल्या) स्पंजांमध्ये बाहेरचा व आतला स्तर चपट्या कोशिकांचा असतो. ग्रैवेय कोशिका ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी त्यांचा स्तर सैल असतो. स्पंजांमध्ये संघटीत असे हेच स्तर असतात. अमीबीय कोशिका पुष्कळ प्रकारच्या असतात. कंटिका निरनिराळ्या रासायनिक संघटनेच्या आणि प्रकारच्या असतात. देहभित्तीत अंतर्वाही (पाणी आत नेणारी) रंध्रे (छिद्रे) असतात, ती नालरूप असून रंध्र-कोशिकांमध्ये असतात आणि बाह्यपृष्ठापासून मध्य गुहेपर्यंत गेलेली असतात. ती उघडू किंवा मिटू शकतात. ग्रैवेय कोशिका वाटोळी वा अंडाकृती असते. कोशिकेच्या मोकळ्या टोकावर एक कशाभिका असून तिच्या बुडाभोवती पारदर्शक, संकोचशील (आंकुचन पावणारे) कॉलरसारखे कडे असते. रंध्रामधून पाणी मध्य गुहेत येते आणि कशाभिका एकसारख्या मागेपुढे हालत असल्यामुळे ते आस्यकामधून बाहेर जाते. अशा तऱ्हेने ताज्या पाण्याचा प्रवाह स्पंजांतून सतत जात असतो. जटिल स्पंजामध्ये या नाल तंत्राची अथवा जल परिसंचरण तंत्राची (शरीरात पाणी खेळविणाऱ्या संस्थेची) अत्यंत कौशल्यपूर्ण परिवर्तने (फेरबदल) आढळतात. पाण्याबरोबर ऑक्सिजन व अन्न (प्लवक म्हणजे पाण्यात तरंगणारे जीव) आत येते आणि निरुपयोगी द्रवे बाहेर जातात. ग्रैवेय कोशिका अन्नाचे अंतर्ग्रहण करून (आत घेऊन) ते पचवितात. कंकाल व वर्गीकरण स्पंजांचा कंकाल (सांगाडा) कंटिकांचा, स्पंजिन- तंतूंचा [केराटिनाचे तंतू; → केराटिने] किंवा दोहोंचाही बनलेला असतो. कंकालाच्या अंशकांच्या (घटकांच्या) लक्षणांवरून पोरिफेरा संघाचे तीन वर्ग पाडले जातात. (१) कॅल्फेरिया : संरचना साधी; कंटिका कॅल्शियम कार्बोनेटाच्या;सामान्यतः त्रिअरी; समुद्राच्या उथळ पाण्यात राहतात. या वर्गात सु. १५० जाती आहेत. उदा., सायकॉन, ग्रॅन्शिया. (२) हेक्झॅक्टिनेलिडा : (काच-स्पंज). कंटिका सिलिकामय, मुख्यतः षडर (सहा अर असलेले) कंटिकापासून अखंड कंकाल तयार होतो. हे स्पंज सगळ्या समुद्रात बऱ्याच खोलीपर्यंत आढळतात. शरीर नळकांड्यासारखे किंवा परडीसारखे. उदा., यूप्लेक्टेला हायालोनेमा. (३) डेमोस्पंजिया : कंकाल फक्त स्पंजिन-तंतूंचा, स्पंजिन–तंतू व सिलिकामय कंटिकांचा किंवा मुळीच नसतो; कंटिका असल्या तर एकार किंवा समचतुररी; केव्हाही षडर नसतात. या वर्गातील स्पंजांच्या असंख्य जाती सगळीकडे आढळतात. नालतंत्र गुंतागुंतीचे व लहान कशाभिक कोष्ठांशी जोडलेले . या वर्गातील क्लायोना हा स्पंज खडकात किंवा मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) कवचात बोगदे तयार करून त्यात राहतो. गोड्या पाण्यातील स्पंज व स्नान-स्पंज (अंग स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणारे स्पंज) या वर्गातील आहेत. या वर्गातील काही स्पंजांत (उदा., ऑस्करेला) कंकाल नसल्यामुळे ते खाद्य पदार्थावर पापुद्र्याप्रमाणे वाढतात. स्त्रोत: मराठी विश्वकोश