केवळ समुद्रात राहणार्या आणि देहगुहा (मध्यस्तरापासून उत्पन्न झालेली व मध्यस्तराचे अस्तर असलेली शरीरातील पोकळी) असणार्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा हा एक संघ आहे. प्राणिसृष्टीतील हा एक महत्त्वाचा संघ असून त्यात तारामीन (अॅस्टरॉयडिया वर्ग), भंगुरतारा (ऑफियूरॉयडिया वर्ग), समुद्री अर्चिन (एकिनॉयडिया वर्ग), सागरी काकडी (होलोथूरॉयडिया वर्ग), पिच्छतारा (क्रिनॉयडिया वर्ग) इ. प्राण्यांचा समावेश होतो. यांच्या आकारात आणि आकारमानात पुष्कळच विविधता आढळून येते. बहुतेक सगळ्या प्राण्यांची सममिती अरीय (त्रिज्यीय) असते [ प्राणिसममिति]. बहुतेकांत कॅल्शियम कार्बोनेटाचा अंत:कंकाल (शरीराच्या आतील सांगाडा) असून शरीरावर त्वचेने आच्छादित कंटक किंवा गुलिका (लहान गाठी) असतात. प्लवकांमध्ये (तरंगणार्या प्राण्यांमध्ये) आढळणार्या काही विशेषित जाती वगळल्या तर एकायनोडर्म प्राणी समुद्राच्या तळावर राहणारे आहेत. समुद्रकिनार्यावरील अंतरावेलीय (भरती आणि ओहोटी यांच्या मधील) प्रदेशापासून तो ३,६५० मीटरांपेक्षाही जास्त खोलीवर ते आढळतात. उथळ पाण्यात ते विपुल असतात. बहुतेक मुक्तजीवी (स्वतंत्र राहणारे) आहेत, पण त्यांच्या हालचाली मंद गतीने होतात; पुष्कळदा तर हे प्राणी बराच वेळ एके जागी स्वस्थ पडलेले असतात. यांच्यापैकी भंगुरतारेच काय ते जलद गतीने हालचाली करणारे आहेत. काही एकायनोडर्म प्राणी संघचारी (समूहात राहणारे) आहेत पण त्यांचे केव्हाही निवह (वसाहती) नसतात. काही समुद्र-नलिनी (क्रिनॉयडिया) लांब देठाने समुद्राच्या तळाला कायमच्या चिकटलेल्या असतात. हे प्राणी विविध रंगांचे– काही तांबडे तर काही जांभळे, काही निळ्या किंवा आकाशी रंगाचे तर काही करड्या किंवा पिवळसर रंगाचे– असतात.

लक्षणे : अंत:कंकाल आणि जल-परिवहन तंत्र (नालांमधून पाण्यासारख्या द्रवपदार्थाचे शरीरात अभिसरण करणारी रचना अथवा व्यवस्था) ही एकायनोडर्माटा संघाची खास लक्षणे असली, तरी या संघाची अशी इतर आणखीही लक्षणे देता येण्यासारखी आहेत.

बहुतेक प्रौढ एकायनोडर्म प्राण्यांची सममिती अरीय असून निरनिराळ्या भागांची किंवा अंगांची व्यवस्था पंचतयी (पाच भागांची बनलेली) असते. डिंभ (अळीसारखी अवस्था) मात्र द्विपार्श्वसममित (सारखे दोन भाग पडणारे) असतात. शरीराचे खंडीभवन (भाग पडलेले) झालेले नसते. शरीराच्या ज्या पृष्ठावर मुख असते ते मुखीय पृष्ठ अथवा मुखपृष्ठ आणि याच्या विरूध्द बाजूला जे पृष्ठ असते ते अपमुखपृष्ठ होय. अपमुखपृष्ठावर असणार्या चकतीसारख्या मॅड्रेपोराइट (खोबणी व भोके असलेले कॅल्शियममय तकट) या संरचनेमुळे प्रौढाच्या अरीय सममितीला काहीसा बाध येतो. आद्यस्तर तीन असतात. शीर्ष नसते (एकिनॉयडिया या नोंदीतील समुद्री अर्चिनाच्या आंतररचनेची आकृती पहा).

शरीर पातळ बाह्यत्वचेने झाकलेले असते. हिच्या खाली मजबूत मध्यस्तरीय अंत:कंकालाचा स्तर असतो. अंत:कंकाल ठराविक नमुन्याच्या कॅल्शियमी चकत्यांचा किंवा तुकड्यांचा बनलेला असतो. शरीराच्या पृष्ठावर दिसणार्या कठीण गुलिका किंवा लांब कंटक कॅल्शियममय असून या चकत्यांपासून किंवा तुकड्यांपासूनच निघालेले असतात.

पाचक तंत्र (पचन संस्था) पूर्ण विकास पावलेले असून आहार नाल (अन्नमार्ग) साधा पण पूर्ण असतो. तो मुखापासून गुदद्वारापर्यंत पसरलेला असून सरळ किंवा कुंडलित (नागमोडी) असतो. गुदद्वार मुखपृष्ठावर किंवा अपमुखपृष्ठावर असते; काहींत ते नसते.

देहगुहा विस्तृत असून तिला पक्ष्माभिकामय (केसांसारख्या बारीक तंतूंनी युक्त असलेल्या) पर्युदराचे (पातळ पटलाचे) अस्तर असते. ती एका द्रव पदार्थाने भरलेली असून त्यात मुक्त अमीबीय कोशिका (पेशी) असतात. देहगुहा प्रामुख्याने पाचक तंत्र आणि जनन तंत्र यांनी व्यापिलेली असते. क्रिनॉइड प्राण्यांमध्ये ती संयोजी ऊतकाच्या (इतर ऊतकांना म्हणजे समान रचना व कार्य असणार्या कोशिका समूहांना जोडणार्या अथवा आधार देणार्या ऊतकाच्या) जाळ्याने व्यापिलेली असते. डिंभाच्या देहगुहेच्या एका भागापासून प्रौढाचे जलपरिवहन तंत्र उत्पन्न होते. हे तंत्र नलिकांचे बनलेले असून त्यात पाण्यासारखा द्रव पदार्थ असतो. या तंत्राच्या अरीय नलिकांच्या शाखा नालपादांना (बारीक नळीसारख्या पायांना) गेलेल्या असतात. नालपाद चलनाचे, अन्न गोळा करण्याचे, श्वसनाचे आणि ज्ञानेंद्रियांचे कार्य करतात.

रुधिर तंत्र अथवा रिक्तीका तंत्र (कोशिकांच्या मध्ये मोकळ्या जागा असलेले तंत्र) विकीर्ण (पसरलेले) व प्रर्हसित (लहान झालेले) असून देहगुहा-प्रणालीत (तंत्रात) असते. देहगुहेपासून बाहेर आलेले त्वचाक्लोम (त्वचेचे बनलेले कल्ले) आणि नालपाद यांच्या द्वारा श्वसनाचे कार्य होते. पण ऑफियूरॉयडिया आणि होलोथूरॉयडिया या वर्गांत ते कार्य अनुक्रमे स्यून (पिशवी) आणि श्वसन-वृक्ष (वृक्षांसारखी श्वसनेंद्रिये) यांच्या द्वारे होते. उत्सर्जनांगे (निरुपयोगी द्रव्य शरीराबाहेर टाकणारे अवयव) नसतात.

तंत्रिका तंत्रामध्ये (मज्जा संस्थेमध्ये) एक परिमुखतंत्रिकावलय (मुखाभोवती असणारे मज्जातंतूंचे कडे) आणि अरीय तंत्रिका यांचा समावेश होतो; शरीरात तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर सामान्यत: प्रत्येकी एक याप्रमाणे तंत्रिकांचे जाळे असते. संवेदी (बाहेरच्या वस्तूंपासून होणारी उद्यीपने ग्रहण करणार्या) तंत्राचा विशेष विकास झालेला नसतो, परंतु स्पर्शेंद्रिये, रसायनग्राही (रासायनिक उद्दीपने ग्रहण करणारी) व प्रकाशग्राही अंगे, अंतिम (टोकावर असणारे) संस्पर्शक, नालपाद इ. ज्ञानेंद्रिये आढळतात.

लिंगे भिन्न असतात. क्वचित उभयलिंगता (नर आणि मादीची इंद्रिये एकाच व्यक्तीत असणे) आढळते. नर आणि मादी यांत बाह्यत: फरक नसतो. जनन-ग्रंथी मोठ्या असून बहुतेकांत अर-सममित असतात; त्यांच्या वाहिन्या साध्या असतात. मादी आपली अंडी समुद्रात घालते आणि नराने समुद्रात सोडलेल्या रेतातील शुक्राणूंच्या योगाने त्यांचे पाण्यातच निषेचन (अंड्यांचा शुक्राणूंशी संयोग होणे) होते. निषेचित अंड्यांचा विकास समुद्रातच होतो आणि त्यांच्यापासून सूक्ष्म, पारदर्शक, पक्ष्माभिकायुक्त आणि मुक्तप्लवी (पोहणारे) डिंभ तयार होतात. यांच्या रूपांतरणाने प्रौढ प्राणी उत्पन्न होतात. एकायनोडर्म प्राण्यांच्या अंगी पुनरूत्पादनाची आश्चर्यकारक शक्ती असते; त्यांच्या शरीराचा एखादा तुटलेला भाग पुन्हा उत्पन्न होतो.

एकायनोडर्माटा संघात सु. ४,०००–६,००० जिवंत जाती आणि सु. २०,००० जीवाश्म (अवशेषरूपी) जाती आहेत. हा संघ एल्युथेरोझोआ आणि पेल्मॅटोझोआ या दोन मोठ्या उपसंघांत विभागलेला आहे. एल्युथेरोझोआ या उपसंघात प्रौढ दशेत मोकळेपणाने हिंडणार्या सर्व प्राण्यांचा समावेश होतो आणि पेल्मॅटोझोआ उपसंघात हल्ली जिवंत असणार्या पिच्छतार्यांचा व वृंत (देठ) असणार्या प्राण्यांचा (क्रिनॉयडिया) आणि बहुसंख्य जीवाश्म-जातींचा अंतर्भाव होतो. एल्युथेरोझोआ या उपसंघाचे (१) अॅस्टरॉयडिया, (२) ऑफियूरॉयडिया, (३) एकिनॉयडिया आणि (४) होलोथूरॉयडिया असे चार वर्ग पाडलेले आहेत. या चारही वर्गांचे प्राणी हल्ली जिवंत आहेत. पेल्मॅटोझोआ या उपसंघाचे बरेच वर्ग पाडलेले आहेत पण त्यांपैकी फक्त एकाच वर्गात (क्रिनॉयडिया) जिवंत प्राणी समाविष्ट असून बाकीचे सगळे वर्ग जीवाश्मांचे आहेत. जीवाश्म वर्गांची आणि त्यांतील जीवाश्मांची माहिती पुढे ‘जीवाश्म’ या सदराखाली दिली आहे.

एकायनोडमार्टा : (१) तारामीन (अॅस्टरॉयडिया), (२) भंगुरतारा (ऑफियूरॉयडिया), (३) समुद्री अर्चिन (एकिनॉयडिया), (४) सागरी काकडी (होलोथूरॉयडिया), (५) पिच्छतारा (क्रिनॉयडिया).एकायनोडमार्टा : (१) तारामीन (अॅस्टरॉयडिया), (२) भंगुरतारा (ऑफियूरॉयडिया), (३) समुद्री अर्चिन (एकिनॉयडिया), (४) सागरी काकडी (होलोथूरॉयडिया), (५) पिच्छतारा (क्रिनॉयडिया).

(१) अॅस्टरॉयडिया : या वर्गातील सर्व प्राणी मुक्तजीवी आहेत. त्यांचा आकार तार्यासारखा असतो; शरीर सामान्यत: पाच भागांचे असते. बाहू केंद्र-बिंबापासून निघालेले असून त्यांची बुडे केंद्र-बिंबात मिसळून गेलेली असतात; ते आखूड, मजबूत आणि लवचिक असून यांची संख्या ५–५० असते; मुख, चरणार-प्रसीता (नळीसारखे बारीक पाय जिच्यात असतात ती खोबण) आणि नालपाद मुखपृष्ठावर (खालच्या पृष्ठावर) असतात; नालपादांच्या टोकावर चूषक (शोषण करणारे इंद्रिय) असतो; गुदद्वार आणि मॅड्रेपोराइट अपमुख-पृष्ठावर असतात; शरीराच्या पृष्ठावर संदंशिका (चिमट्यासारख्या सूक्ष्म संरचना) असतात. या वर्गात सगळ्या तारामीनांचा समावेश होतो. अॅस्टेरिअॅस हे या वर्गाचे उदाहरण होय [अॅस्टरॉयडिया].

(२) ऑफियूरॉयडिया : या वर्गातील प्राण्यांचा आकार तारामीनांच्या आकारासारखाच म्हणजे तार्यासारखा असतो. शरीर सामान्यत: पाच भागांचे असते; त्याच्या मध्यावर केंद्र-बिंब असून त्याच्यापासून पाच विकीर्ण बाहू निघालेले असतात; केंद्र-बिंब वाटोळे असून बाहूंची बुडे त्याच्यापासून स्पष्टपणे वेगळी असतात; बाहू लांब, सडपातळ आणि अतिशय लवचीक असून काही जातींत शाखित असतात; त्यांचा उपयोग चलनाकरिता होतो; चरणार-प्रसीता नसतात. पण असल्याच तर त्या उघड्या नसून अस्थिकांनी (बारीक अस्थींनी) झाकलेल्या असतात; नालपाद संस्पर्शकांच्या स्वरूपाचे असून त्यांच्या टोकावर चूषक नसतो, त्यामुळे चलनाच्या कामी त्यांचा उपयोग होत नाही; मॅड्रेपोराइट केंद्र-बिंबाच्या मुखपृष्ठावर असतो; गुदद्वार आणि संदंशिका नसतात. या वर्गात सगळ्या भंगुरतार्यांचा समावेश होतो. ऑफियूरा, ऑफिओथ्रिक्स आणि अॅस्ट्रोफायटन ही या वर्गाची उदाहरणे होत [ऑफियूरॉडिया].

(३) एकिनॉयडिया : या वर्गातील प्राणी जवळजवळ वाटोळे किंवा अर्धगोल (समुद्र अर्चिन), जाड अंडाकृती गिरदीसारखे (हार्ट अर्चिन) किंवा बिंबाभ म्हणजे जाड तकटासारखे (केक अर्चिन) असतात. सगळे मुक्तजीवी असतात. बाहू नसतात; कंकालाचे (सांगाड्याचे) कॅल्शियमी तुकडे किंवा चकत्या एकमेकांशी घट्ट जोडून चोल (कठीण बाह्य आवरण) तयार होतो; शरीरावर हालविता येणारे लहानमोठे कंटक आणि संदंशिका असतात; चरणार-प्रसीता अस्थिकांनी झाकलेल्या असतात; जल-परिवहन तंत्र विशेष विकसित असते; टोकावर चूषक असलेले नालपाद असतात.

या वर्गाचे रेग्युलॅरिया आणि इर्रेग्युलॅरिया असे दोन उपवर्ग केलेले आहेत. ज्या प्राण्यांमध्ये अरीय सममिती स्पष्टपणे दिसून येते ते सगळे रेग्युलॅरिया उपवर्गात घातलेले आहेत आणि ज्यांची अरीय सममिती गौण द्विपार्श्व-सममितीमुळे अस्पष्ट झालेली असते अशा सगळ्या प्राण्यांचा इर्रेग्युलॅरिया उपवर्गात समावेश होतो. एकिनस व साल्मॅसिस (समुद्र अर्चिन), लोव्हेनिया व एकायनोकार्डियम (हार्ट अर्चिन) आणि एकिनॅरॅक्नियस व क्लायपीअॅस्टर (केक अर्चिन) ही या वर्गाची काही उदाहरणे होत [एकिनॉयडिया].

(४) होलोथूरॉयडिया : या वर्गातले सगळे प्राणी मुक्तजीवी आहेत. शरीर मऊ व लांबोडके असते; बाहू नसतात; देहभित्ती जाड व चामट किंवा पातळ असते; कंकाल अवशेषी असून त्वचेत विखुरलेल्या कॅल्शियमी तकटांचा किंवा कंटिकांचा बनलेला असतो; काही रूपांत तर त्याचा पूर्ण अभाव असतो; शरीरावर कंटक नसतात; संदंशिका नसतात; अरीय सममिती अस्पष्ट असते; मुख शरीराच्या अग्र (पुढच्या) टोकावर आणि गुदद्वार पश्च (मागच्या) टोकावर असते; मुखाभोवती मोठ्या प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणार्या) संस्पर्शकांचे (परिमुख-संस्पर्शक) एक वलय असते (हे संस्पर्शक परिवर्तित नालपाद असतात); चूषक असलेले नालपाद असतात; मॅड्रेपोराइट एकापेक्षा जास्त असून आंतरिक (शरीराच्या आत) असतात; बहुतेकांत श्वसनाकरिता देहगुहेत श्वसन-वृक्ष असून तो अवस्करात (ज्यात आतडे, युग्मक वाहिनी आणि मूत्र वाहिन्या उघडतात त्या शरीराच्या मागच्या टोकाकडे असणार्या समाईक कोष्ठात) उघडतो; या वर्गात सगळ्या सागरी काकड्यांचा समावेश होतो. होलोथूरिया आणि क्युक्युमॅरिया ही या वर्गाची उदाहरणे होत [होलोथूरॉयडिया].

(५) क्रिनॉयडिया : पेल्मॅटोझोआ उपसंघाचे जे अनेक वर्ग पाडलेले आहेत त्यांपैकी, जिवंत प्राण्यांचा ज्यात समावेश केलेला आहे असा क्रिनॉयडिया हा एकमेव वर्ग होय.

या वर्गात समुद्र-नलिनी आणि पिच्छतारे यांचा समावेश होतो. बाल्यावस्थेत किंवा सर्व आयुष्यभर, अपमुखपृष्ठाच्या मध्यापासून निघालेल्या वृंताने शरीर समुद्राच्या तळाला चिकटलेले असते; वृंत त्वचीय अस्थिकांचा बनलेला असतो; बुडापाशी दुभागलेले आणि पिच्छिका (बाहूच्या बाजूंवर निघालेल्या शाखा) असलेले पाच बाहू असतात; मुख आणि गुदद्वार वरच्या पृष्ठावर (मुख-पृष्ठावर) असतात; चरणार-प्रसीता पक्ष्माभिकायुक्त असून मुख-पृष्ठावर असतात; नालपाद संस्पर्शकांच्या स्वरूपाचे असून अन्न गोळा करण्याकरिता त्यांचा उपयोग होतो; कंटक, संदंशिका आणि मॅड्रेपोराइट नसतात. पिच्छतारे परिपक्वता येताच वृंतापासून तुटून अलग होतात आणि आपले बाहू हालवून पोहतात. पेंटॅक्रायनस आणि अँटेडॉन ही या वर्गाची उदाहरणे होत.

सीलेंटेरेटांप्रमाणेच एकायनोडर्माटा अर-सममित असतात. शरीर बहुधा पंचारीय (पाच अरीय भाग असलेले), दंडगोलाकार किंवा वाटोळे असते. अर बहुधा पाच असून मुखापासून फाकलेले असतात. गुदद्वार असले तर बहुधा अपमुख-पृष्ठावर असते, पण क्रिनॉयडियात ते मुखाच्या बाजूला असते. आहार-नाल मुखापासून सरळ किंवा वळसे घेऊन गुदद्वारापर्यंत गेलेला असतो. शरीरातील इतर प्रत्येक तंत्रात एक वलय आणि अरावरून गेलेली एक नलिका किंवा रज्जू असते. वलय मुख आणि अपमुख-पृष्ठाचा मध्य यांतून गेलेल्या अक्षाभोवती असते. विविध तंत्रांच्या अरीय भागांचे अर बनलेले असतात. अरांच्यामधील क्षेत्रांना अंतरार म्हणतात. बहुतेक तंत्रे चरणार-पृष्ठाच्या खाली त्याला लागूनच असतात; नालपाद त्याच्यावरूनच पुढे आलेले असून त्यांचे अरीय पट्टे असतात; यांना चरणार-क्षेत्रे म्हणतात. अॅस्टरॉयडिया आणि क्रिनॉयडिया यांच्यात प्रत्येक चरणार-क्षेत्रावरील नालपाद एका चरणार-प्रसीतेच्या दोन्ही बाजूंना ओळीने असतात. या प्रसीतेच्या बुडाशी अरीय तंत्रिका-रज्जू (जाड तंत्रिका) असते. इतर वर्गांमध्ये चरणार-प्रसीता झाकलेली असल्यामुळे तंत्रिका-रज्जूवर अधितंत्रिक (अरीय तंत्रिकेच्या वर असणारा) नाल तयार होतो. अॅस्टरॉयडिया, ऑफियूरॉयडिया आणि क्रिनॉयडिया या वर्गांत अरांच्या दिशेने शरीर बाहूंच्या स्वरूपात लांब झालेले असते. वर्तुलाकृती एकिनॉयडिया आणि लांबट होलोथूरॉयडिया यांचे शरीर आटपसर असून चरणार-पृष्ठ बहुतेक सर्व शरीरावर पसरलेले असते आणि मुखाच्या विरूध्द टोकावर एक अगदी लहानसा भाग अपमुख-पृष्ठ म्हणून शिल्लक राहतो. सममिती केव्हाही परिपूर्ण नसते आणि एकिनॉयडियात व होलोथूरॉयडियात एक नवी आणि ठळक द्विपार्श्व-सममिती उत्पन्न होऊन तिचा कित्येक अंगांवर परिणाम होतो.

क्रिनॉयडिया त्यांच्या अपमुख-पृष्ठांच्या मध्यावरून निघालेल्या वृंताने समुद्राच्या तळाला चिकटलेले असतात. यांच्यापैकी काही प्रौढ दशा आल्यावर वृंतापासून तुटून अलग झाले तरी त्यांचे मुख कायमचे वरच्या बाजूलाच असते. हल्लीच्या जिवंत एकायनोडर्माटांचे इतर वर्ग मुक्तजीवी आहेत. अॅस्टरॉयडिया, ऑफियूरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत मुख खालच्या बाजूला असते. होलोथूरॉयडियांच्या लांबट शरीराची एक बाजू नेहमीच जमिनीवर टेकलेली असल्यामुळे त्यांचे मुख आडवे असते.

नालपाद : यांचे मूळ कार्य कदाचित संवेदी (उद्दीपन ग्रहण करण्याचे) असावे; पण अॅस्टरॉयडिया, एकिनॉयडिया आणि होलोथूरॉयडियात त्यांच्या टोकावर असलेल्या चूषकामुळे चालण्याकरिता त्यांचे अनुकूलन झालेले असते. प्राय: श्वसनाकरिता त्यांचा नेहमीच उपयोग होतो आणि एकिनॉयडियाच्या इर्रेग्युलॅरिया या उपवर्गात काहींचे या कार्याकरिता रूपांतर झालेले असते. भक्ष्य पकडण्याकरिताही काहींचे परिवर्तन होणे शक्य आहे. नालपादात असणार्या द्रवाचा दाब जास्त किंवा कमी करून ते बाहेर काढता येतात किंवा आत ओढून घेता येतात.

बाह्यत्वचा : ही बहुधा पक्ष्माभिकायुक्त असते; पण क्रिनॉयडियात पक्ष्मामिका फक्त चरणार-प्रसीतांमध्येच असतात आणि ऑफियूरॉयडियात त्या नसतातच; त्याचप्रमाणे बाह्यत्वचेत ग्रंथिकोशिका आणि संवेदी कोशिका असतात. संवेदी कोशिकांपासून तंतुक (बारीक तंतू) निघालेले असतात आणि ते उपकला (अस्तराप्रमाणे असणार्या समान कोशिकांच्या स्तरातील) कोशिकांच्या बुडाशी असलेल्या तंत्रिकाजालाला जोडलेले असतात. त्वचेतील लाक्षणिक अस्थिका विखुरलेल्या असतात व त्यांमुळे कातडी चामट झालेली असते किंवा त्या स्नायूंनी एकमेकींना जोडलेल्या असतात व त्यामुळे कंकाल बनतो किंवा त्या एकमेकींना घट्ट जोडलेल्या असतात व त्यामुळे कवच तयार होते. काहींच्यापासून बहुधा कंटक निघालेले असून त्यांच्यावरील बाह्यत्वचा लवकरच झिजून नाहीशी होते. संदंशिका दोन किंवा तीन पाकळ्यांचे चिमटे असून संरक्षण हे त्यांचे मुख्य कार्य असते; त्या विविध प्रकारच्या असून फक्त अॅस्टरॉयडिया आणि एकिनॉयडियात असतात.

आहार-नाल : एकायनोडर्माटाच्या विविध वर्गांतील आहार-नालात बराच फरक असतो. अॅस्टरॉयडिया आणि ऑफियूरॉयडिया यांत तो सरळ उभा असतो आणि इतर वर्गांत त्याला वेटोळी पडलेली असतात. निरनिराळ्या प्रकारांत त्यांच्यापासून अनेक अंधवर्ध (लहान बंद नळ्या) निघालेले असतात. तारामीनांच्या थोड्या जातींत आणि ऑफियूरॉयडियात गुदद्वार नसते; परंतु ज्या वर्गांत ते असते तेव्हा (होलोथूरॉयडिया वगळून) बहि:केंद्रक (मध्यभागी नसून बाजूला असणारे) असते.

देहगुहा : प्रौढ प्राण्यांच्या देहगुहेचे कित्येक स्पष्ट भाग असून त्यांची भिन्न तंत्रे बनलेली असतात : (१) परिआंतरांग गुहा : (आंतरेंद्रियांना वेढणारी गुहा). हिच्यात सर्व मुख्य आंतरांगे असतात. (२) परिरुधिर तंत्र : (रूधिराभिसरण तंत्र). यात मुखाभोवती असलेली वलयवाहिका आणि प्रत्येक बाहूच्या अरावरून गेलेली एकेक अरीय वाहिका यांचा समावेश होतो. अॅस्टरॉयडियात अरीय वाहिकेचे एका उभ्या पडद्याने अनुदैर्घ्य (लांबीला अनुसरून) विभाजन झालेले असते आणि या पडद्यात मुख्य रुधिरवाहिका असते. (३) अपमुख कोटर तंत्र : (गुहिका, खळगे यांचे बनलेले तंत्र). जनन-प्राक्ष (ज्यांच्यापासून जनन-ग्रंथी उत्पन्न होतात त्या प्राथमिक जनन-कोशिकांचे वलय) आणि जनन-ग्रंथी यांना या तंत्राने घेरलेले असते. (४) जल-परिवहन तंत्र : हे परिरुधिर तंत्राच्या वर असून त्यात मुखाभोवती असणारे वलय, मॅड्रेपोराइटातून बाहेर उघडणारा अश्मनाल (कॅल्शियमयुक्त कठीण भित्ती असलेला नाल) आणि प्रत्येक अरावरून गेलेली एक अरीय वाहिका यांचा समावेश होतो. अरीय वाहिकांपासून पार्श्वशाखा निघून नालपादांना गेलेल्या असतात. चालण्याच्या कामी उपयोगी पडणार्या नालपादांच्या बुडाशी तुंबिका (फुगवटे) असतात आणि त्यांच्या आकुंचनाने नालपाद लांब होऊन बाहेर येतात. (५) मॅड्रेपोरी आशय : ही एक लहान गुहिका (पोकळी) असून तिचे आकृतिक (रचना आणि आकार यांच्या दृष्टीने) महत्त्व आहे. (६) अक्षीय कोटर : अॅस्टरॉयडियात हे नजरेत न भरणारे, ऑफियूरॉयडियात व एकिनॉयडियात लहान, होलोथूरॉयडियात अतिशय लहान आणि क्रिनॉयडियात परिआंतरांग गुहेत विलीन झालेले असते. अंतरारांपैकी एकात असणार्या एका छिद्रातून अथवा छिद्रांच्या एका गटातून (मॅड्रेपोराइट) याचे बाहेरच्या बाजूशी दळणवळण असते. बहुतेक होलोथूरियन प्राण्यांमध्ये याचे देहगुहेशी दळणवळण असते.

अॅस्टेरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत अपमुख बाजूवर ठळक मॅड्रेपोराइट असतो व त्याला पुष्कळ छिद्रे असतात. ऑफियूरॉयडियात तो मुखाच्या बाजूवर असतो आणि त्याला एकच किंवा थोडी छिद्रे असतात. बहुतेक होलोथूरॉयडियांत तो देहभित्तीपासून अलग झालेला असून त्याला कित्येक छिद्रे असतात; तो परिआंतरांग गुहेत अश्मनालाने लोंबत असतो; यामुळे त्याचे बाहेरच्या बाजूशी दळणवळण नसून या गुहेशीच असते. या वर्गात पुष्कळ अश्म-नाल असू शकतात आणि प्रत्येकाच्या टोकावर छिद्रित आंतरिक मॅड्रेपोराइट असतो. क्रिनॉयडियात कित्येक अश्म-नाल असून टोकावरील एका छिद्राने प्रत्येक परिआंतरांग गुहेत उघडतो आणि परिआंतरांग गुहा कित्येक छिद्रांमधून बाहेर उघडते.

होलोथूरॉयडियाखेरीज बाकीच्या सगळ्या वर्गांत अक्षीय अंग नावाची एक विशिष्ट संरचना असते; ती संयोजी आणि रिक्तीका ऊतक (मधूनमधून मोकळ्या जागा असणारे ऊतक) आणि जननिक अल्पविकसापासून (जनन-विरोहापासून) म्हणजे जनन-प्राक्षाशी संबंध असणार्या अक्षीय अंगातील प्राथमिक जनन-कोशिकांच्या समूहापासून उत्पन्न झालेल्या कोशिकांची बनलेली असते. अक्षीय कोटराला लागूनच अक्षीय अंग असते. क्रिनॉयडियामध्ये ते शरीराच्या अक्षावरच असते. याच्या कार्याविषयी काही माहिती नाही.

उत्सर्जन : एकायनोडर्माटाच्या उत्सर्जनाविषयी फारच थोडी माहिती आहे. मलाच्या कणांनी भरलेल्या अमीबीय कोशिका क्लोम (कल्ल्यांच्या) भित्तींमधून बाहेर पडून त्यांच्या योगाने उत्सर्जन होते; त्याचप्रमाणे श्वसनेंद्रियांच्या अथवा आंत्राच्या (आतड्याच्या) द्वारे ते होते. उत्सर्जनाकरिता खास अंगे नसतात.

श्वसन : वेगवेगळ्या संरचनांच्या द्वारे श्वसन होते. अॅस्टरॉयडिया आणि एकिनॉयडिया यांत नालपाद आणि क्लोम श्वसनाचे कार्य करतात तर ऑफियूरॉयडियात ‘जनन-स्यून’ (ज्यात जनन-ग्रंथी उघडतात अशा बाहेर उघडणार्या गुहिका) आणि होलोथूरॉयडियात श्वसन-वृक्ष ते कार्य करतात.

परिवहन तंत्र : एकायनोडर्माटाचे परिवहन तंत्र एका विशेष रिक्तीका-ऊतकाच्या पेडांच्या संहतीचे बनलेले असते; या ऊतकात मधूनमधून एकमेकींशी संबंध असलेल्या आणि उपकलेचे अस्तर नसलेल्या जागा असतात. इतर काही प्राण्यांमध्ये आढळणार्या रुधिर-गुहिका तंत्रासारखेच हे तंत्र असते; पण याचे स्वरूप आणि कार्यपद्धती भिन्न असतात. मुखाभोवती परिरुधिर-वलयाच्या आत किंवा त्याच्या लगेच वर रिक्तिका-ऊतकाचे एक वलय असते. या वलयापासून निघून, प्रत्येक अरामध्ये, अरीय परिरुधिर नालावरून गेलेला एक अरीय पेड अथवा वाहिका असते. या तंत्राचा दुसरा भाग अक्षीय अंगात असून त्याने मुख-वलय एका अपमुख-वलयाला जोडले जाते. हे अपमुख-वलय जनन-प्राक्षाबरोबरच असते आणि त्याच्यापासून जनन-ग्रंथींना पेड गेलेले असतात. एकिनॉयडिया आणि होलोथूरॉयडिया यांत दोन मोठ्या वाहिका उत्तर–आणि अधर-मुख-वलयापासून निघून आहार-नालाबरोबर पण विरूध्द बाजूंनी जातात. यांच्यापासून निघालेल्या शाखांचे जाळे आहार-नालावर पसरलेले असते. इतर वर्गांतील आहार-नालांवरही अशाच तर्हेचे शाखाजाल असते.

तंत्रिका तंत्र : तंत्रिका तंत्र काहीसे आदिम (आद्य) असते. त्यात मुख्यत: तंत्रिका-जालांचा आणि त्यांच्या एकीकरणाने बनलेल्या तंत्रिका-रज्जूंचा समावेश होतो. सामान्यत: अशी तीन जाळी असून ती शरीरात वेगवेगळ्या पातळीवर असतात. पहिले, मुख तंत्र मुखाच्या बाह्यत्वचेखाली असून ते मुख्यत: ग्रसिकेभोवती (घशाभोवती) असणारे एक वलय आणि त्याच्यापासून निघून प्रत्येक चरणार-क्षेत्रावरून त्याच्या टोकापर्यंत गेलेल्या तंत्रिका-रज्जूंचे बनलेले असते. जिवंत एकायनोडर्म प्राण्यांच्या सगळ्या वर्गांत (क्रिनॉयडियाखेरीज) मुख तंत्र हा तंत्रिका तंत्राचा मुख्य भाग असतो. क्रिनॉयडियातील प्रौढ प्राण्यांमध्ये या तंत्राचे महत्त्व काहीसे कमी झालेले आहे. खोल जागी असलेले अधस्तंभिका तंत्र (अरीय आणि अनुप्रस्थ प्रेरक तंत्रिकांचे तंत्र) आणि अपमुख तंत्र ही बाकीची दोन तंत्रे मुख तंत्राच्या नमुन्याचीच असतात, पण त्यांची फारशी वाढ झालेली नसते. होलोथूरॉयडियात अपमुख तंत्र आढळत नाही, पण क्रिनॉयडियात मात्र ते प्रमुख असते.

ज्ञानेंद्रिये : एकायनोडर्माटामध्ये फारच थोडी ज्ञानेंद्रिये असतात. शरीराची उपकला सर्वसाधारणपणे संवेदी असते. नालपादांमध्ये ही संवेदिता तीव्र असते. मुखाभोवती असणारे नालपाद आणि होलोथूरॉयडियातील संस्पर्शक गंधेंद्रियांचे कार्य करीत असावेत असा समज आहे. काही होलोथूरियन प्राण्यांच्या त्वचेत संतुलन-पुटी (शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिय) असतात. अॅस्टरॉयडियात बाहूंच्या टोकावर असलेल्या संवेदी अंतिम संस्पर्शकाच्या बुडाशी दृक्-बिंदू (डोळ्याचे कार्य करणार्या वर्णकाचा म्हणजे रंगद्रव्याचा ठिपका) असतो.

जनन : अगदी थोडे अपवाद सोडले तर एकायनोडर्माटात लिंगे भिन्न असतात. ऑफियूरॉयडिया आणि होलोथूरॉयडिया या वर्गांतील अगदी थोड्या जाती उभयलिंगी असतात. जननांगे अगदीच साधी असतात आणि त्यांची व्यवस्था अर-सममित असते. जनन तंत्रात (होलोथूरॉयडिया वगळून) जनन-विरोह, जनन-प्राक्ष (हे एक वलय असून जनन-विरोहाला जोडलेले असते), जनन-ग्रंथी आणि त्यांच्या वाहिन्या यांचा समावेश होतो. जनन-ग्रंथी अंतरारीय असून त्या कोशासारख्या किंवा नलिकेच्या स्वरूपाच्या आणि पुष्कळदा शाखित असतात. त्या जनन-प्राक्षाच्या शाखांवर असतात. क्रिनॉयडियात युग्मक (जनन-कोशिका) वाहिन्या नसतात. होलोथूरॉयडियात एकच जनन-ग्रंथी असून ती उत्तर अंतरारात असते; तिची वाहिनी पृष्ठआंत्रयोजनीत असते आणि तिच्यावर अवशेषी जनन-विरोह असतो. जनन-प्राक्ष नसतो.

प्रजोत्पादनाच्या काळात युग्मके जनन-ग्रंथींतून थेट समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. अंड्यांचे निषेचन समुद्राच्या पाण्यातच होते. बहुतेकांत युग्मनजाचा (युग्मकांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या संरचनेचा) विकास समुद्राच्या पाण्यात होतो. अंड्यातून मुक्तप्लावी डिंभ बाहेर पडतो. अॅस्टरॉयडियाच्या डिंभाला बायपिनॅरिया म्हणतात; काही आठवड्यांनंतर याच्यापासून ब्रेकिओलॅरिया नावाचा दुसरा डिंभ तयार होतो. ऑफियूरॉयडिया व एकिनॉयडिया या वर्गांतील डिंभाला प्लूटियस म्हणतात आणि होलोथूरॉयडियात त्याला ऑरिक्युलेरिया हे नाव दिलेले आहे. क्रिनॉयडियाचा डिंभ पिंपाच्या आकाराचा असतो. या सर्व द्विपार्श्व-सममित डिंभांच्या रूपांतरणाने प्रौढ प्राणी तयार होतात.

या संघातील प्राण्यांच्या अंगी शरीराच्या तुटलेल्या भागांचे पुनरूत्पादन करण्याची असामान्य शक्ती असते. तारामीन, भंगुरतारा किंवा पिच्छतारा यांचा एखादा बाहू तुटला तर त्याच्या जागी नवीन बाहू उत्पन्न होतो. पुष्कळ होलोथूरियन प्राण्यांच्या अंगी ही शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. जरूर पडल्यास ते शरीरातील सर्व अंगे बाहेर काढून टाकतात आणि सु. २५ दिवसांत त्याच्या जागी नवी उत्पन्न करतात.

एकायनोडर्म प्राण्यांचे शरीर काटेरी असल्यामुळे भक्ष्य म्हणून त्यांचा फारसा उपयोग होत नाही. मात्र समुद्रातील प्राणी त्यांची अंडी खातात. चिनी लोक सागरी काकडीचा रस्सा करतात. समुद्रकिनार्यावर जेथे एकायनोडर्म प्राणी विपुल असतात तेथे त्यांच्यापासून खत तयार करतात. या प्राण्यांच्या अंड्यांचा जीवविज्ञान प्रयोगशालांतून प्रयोगांकरिता उपयोग करतात. कृत्रिम अनिषेकजननाचा (अलैंगिक रीतीने होणार्या जननाचा) शोध प्रथम समुद्री अर्चिनांच्या अंड्यांवरील प्रयोगावरूनच लागला.

ऑयस्टर हे तारामीनांचे एक आवडते खाद्य असल्यामुळे ते त्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करतात.

संदर्भ : 1. Beerbower, T. R. Search for the Past : An Introduction to Paleontology, New Delhi,

1965.

2. Easton, W. H. Invertebrate Paleontology, New York, 1960.

3. Harmer, S. F.; Shipley, A. E. Ed., The Cambridge Natural History, Vol. I, Codicote

(England), 1968.

4. Hyman, L. H. The Invertebrates : Echinodermata, Vol. IV, New York, 1955.

लेखक : क. वा. केळकर, कुसुम गोखले

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश