हे मूळ डच नाव असून त्याचा अर्थ ‘भू-सूकर’ असा आहे. दात असलेला हा एकच मुंगीखाऊ प्राणी आहे. शास्त्रीय नाव ओरिक्टेरोपस अॅफर. आफ्रिकेत इथिओपियापासून दक्षिणेकडे केपपर्यंत तो आढळतो. लांबी सुमारे १·५ मी. असते. शरीर मजबूत व राकट असते. मुख नलिकाकार असून त्यात लांब जीभ असते. मुस्कट डुकरासारखे आणि कान लांब असतात. शेपूट मांसल व गुबगुबीत असते. शरीरावर आखूड राठ केस असतात. पाय आखूड व मजबूत असतात. पुढच्या पायांवर चार व मागच्यांवर पाच मजबूत बोथट नखर (नख्या) असतात. हा रात्रिंचर व बिळात राहाणारा प्राणी आहे. वाळवी व मुंग्या हे याचे भक्ष्य होय. वारुळाला भोके पाडून आपल्या लांब जिभेने तो वाळवी किंवा मुंग्या टिपतो.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश