अॅनेलिडा (वलयी प्राण्यांच्या) संघाच्या तीन वर्गांपैकी एका वर्गाचे नाव. या वर्गात वलयी कृमींच्या सहा-सात वंशांचा समावेश होतो. रचनेच्या साधेपणामुळे हे आद्य वलयी प्राणी असावेत असा एकेकाळी समज होता व म्हणूनच त्यांना आर्किअॅनेलिडा हे नाव दिले गेले. परंतु आता असे सिद्ध झाले आहे की, रचनेचा हा साधेपणा लघुकरणामुळे (शरीरातील कित्येक रचना लहान किंवा नाहीशा झाल्यामुळे ) उत्पन्न झालेला आहे. आर्किअॅनेलिड प्राण्यांच्या शरीराचे स्पष्टपणे खंड पडलेले असतात पण हे खंडीभवन मुख्यतः आंतरिक असते; पार्श्वपाद (शरीर- पॉलिगॉर्डियस (अ) जीवंत प्राण्यांचे पृष्ठीय दृश्य; (आ) अग्र टोकाचे अधर दृश्य : (१) संस्पर्शक, (२) अभिमुख, (३) मुख, (४) परिमुख, (५) संस्पर्शकावरील पिंडिका. खंडांच्या बाजूंवर जोडीने असणारे व पोहण्याकरिता उपयोगी पडणारे लहान स्नायुमय अवयव) नसतात किंवा त्यांचा र्हास झालेला असतो; शूक (राठ केसांसारख्या रचना) देखील नसतात अथवा साधे असतात. पुष्कळ जातींच्या शरीरावर पक्ष्माभिकांची (केसासारख्या अगदी बारीक तंतूंची) वलये अथवा पट्टे असतात आणि पक्ष्माभिकांच्या हालचालींमुळे संचलन होते; अभिमुखावर (कृमींमध्ये मुखाच्या पुढे असणारा डोक्याचा भाग, प्रोस्टोमियम) कधीकधी डोळे, स्पर्शक (अभिमुखावर असणारी संवेदी उपांगे), ग्रीवापृष्ठीय अंगे (अभिमुखाच्या पृष्ठावर असलेली ज्ञानेंद्रिये) अथवा शृंगिका (स्पर्शेंद्रिये) देखील असतात; बहुतेक जातीत तंत्रिका तंत्र (मज्जातंतू व्यूह) बाह्यत्वचेत असते; पॉलिगॉर्डिडी कुल सोडून बाकीच्या कुलांत एक स्नायुमय ग्रसनी-कोष्ठ (घशालगतची कोठी) असतो; उत्सर्जन तंत्र डायनोफायलसमध्ये आदिवृक्ककांचे (वृक्कक म्हणजे शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारे नळीसारखे इंद्रिय) व इतर सर्व कुलांमध्ये पश्चवृक्ककांचे बनलेले असते; काही जातीत लिंगे भिन्न असतात पण इतर जाती उभयलिंगी असतात; नेरिल्लिडी आणि डायनोफायलिडी या कुलांत विकास सरळ असतो, पण इतर कुलांत ट्रोकोफोर डिंभ (फलन झालेल्या अंड्यापासून होणाऱ्या प्राण्याच्या विकासातील एक स्वतंत्र व प्रौढ प्राण्याशी साम्य नसलेली क्रियाशील पूर्व अवस्था) उत्पन्न होतो. हल्ली आर्किअॅनेलिडांची पॉलिगॉर्डिडी, सॅक्कोसीरिडी, प्रोटोड्रायलिडी, नेरिल्लिडी आणि डायनोफायलिडी अशी पाच कुले आहेत असे मानतात. पॉलिगॉर्डिडी कुलातील कृमी लांब व त्यांच्या शरीराचे पुष्कळ खंड पडलेले असतात; अग्र टोकाशी उपांगांची एकच जोडी असते; संचलन पक्ष्माभिकांमुळे होत नाही; पार्श्वपाद नसतात; बहुतेक प्रकारात शूक नसतात; उदा.,पॉलिगॉर्डियस. सॅक्कोसीरिडी कुलातील कृमींच्या प्रत्येक खंडावर दोन्ही बाजूंना एकेक नलिकाकार पार्श्वपाद असून त्याच्यावर शूकांचा एकेक जुडगा असतो; तंत्रिका तंत्र बाह्यत्वचेच्या खाली असते; उदा., सॅक्कोसीरस. प्रोटोड्रायलिडी कुलातील प्राण्यांच्या प्रत्येक खंडाभोवती पक्ष्माभिकांचे अपूर्ण वलय असते; अग्र टोकाशी उपांगांची एक जोडी; पार्श्वपाद किंवा शूक नसतात; उदा., प्रोटोड्रायलस. नेरिल्लिडी कुलात शरीराचे खंड नऊपेक्षा जास्त नसतात; स्पर्शकांची एक आणि मुखपूर्व संस्पर्शकांच्या (लांब, लवचीक स्पर्शेंद्रियांच्या) तीन जोड्या; पार्श्वपादांची थोडीफार वाढ झालेली असून प्रत्येकावर एका रोमाने (ताठ केसासारख्या रचनेने) विभक्त झालेले शूकांचे दोन जुडगे असतात; उदा., नेरिल्ला. डायनोफायलिडी कुलातील कृमी आखूड असतात; पुढच्या उपां-गांची जोडी, पार्श्वपाद अथवा शूक नसतात; परंतु शरीराभोवती पक्ष्माभिकांची अपूर्ण वलये असतात; उदा., डायनोफायलस. बहुतेक आर्किअॅनेलिड प्राणी समुद्रात वाळूमध्ये राहतात, परंतु काही मचूळ पाण्यात व गोड्या पाण्यातही असतात. स्त्रोत: मराठी विश्वकोश