पर्यटन म्हणजे मनोरंजन, पर्यटन म्हणजे साहस, पर्यटन म्हणजे व्यवसाय किंवा कामानिमित्त केलेला प्रवास होय. धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापातून एक ते दोन दिवस मोकळीक मिळाली की, निवांतस्थळी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची इच्छा माणसाच्या मनात असते. त्यामुळे भटकंतीला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनामध्ये धार्मिक पर्यटनाबरोबरच अलीकडे सांस्कृतिक पर्यटन, खाद्यपर्यटन, पर्यावरण पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, आणि झपाट्याने विकसित होणारे ‘कृषी पर्यटन’ यांचा समावेश होतो. केल्याने देशाटन, पंडीत मैत्री; सभेत संचार। शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार’ असे कवींनी लिहून ठेवले आहे. मनुष्याला चतुरपण येण्यासाठी ग्रंथवाचन, पंडीतांची मैत्री, सभेत संचार आणि त्याचबरोबर देशाटन महत्त्वाचे आहे. पर्यटन, भटकंती करणे ही मनुष्याची स्वाभाविक आवड आहे. पर्यटनाला हजारो वर्षांची परंपरा आहे. मनुष्याच्या उत्क्रांती बरोबरच त्याची भटकंती होत राहिली आहे, कामाच्या निमित्ताने मनुष्याचा प्रवास होतो. परंतु पर्यटन ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे. लॅटीन भाषेतील TORNOS या शब्दापासून आलेला टूअर हा शब्द म्हणजे प्रवास. त्याचा मुळ अर्थ वर्तुळ आहे. पुढे याच शब्दापासून वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टुर्स हा शब्द रूढ झाला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 21 व्या शतकातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या व्यवसायामध्ये आतिथ्य, पर्यटन हे व्यवसाय आहेत. सुट्टी मिळाली की, आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह फिरायला निघणे, गर्दीने वेढलेल्या स्थळाऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात निवांत शांततेचे क्षण अनुभवायला जातात. अतिथी देवो भव ‘अतिथी देवो भव:’ ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात जावेसे वाटते म्हणून ‘कृषी पर्यटन’ हा अलीकडे झपाट्याने विकसित झालेल्या पर्यटनाचा प्रकार आहे. ‘गाव आणि गावपण’ हरवत चाललंय असे आपण म्हणतोय परंतु आजही खेड्याची ओढ असलेले शहरी भागातले लोक आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाते टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन पिढीला या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी खेड्यात जातात. महाराष्ट्राचे अग्रेसरत्व कृषी पर्यटनाचा उगम साधारणत: 70 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, कॅनडा व युरोपीय देशामध्ये कृषी पर्यटन हे अधिक मोठ्या प्रमाणात होते. देशात कृषिपर्यटनाची चळवळ सुरू करणारे महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रात प्रथम बारामती येथे स्व.आप्पासाहेब पवार यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले. शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची नि:शुल्क राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जात असे. कालांतराने शुल्क आकारून कृषी अभ्यास दौरे आयोजित केले जाऊ लागले. अशा तऱ्हेने महाराष्ट्रात कृषी पर्यटनाचे बीज रोवले गेले.महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटन महासंघ तयार करण्यासाठी बारामतीचे पांडुरंग तावरे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्रामध्ये तीनशेपेक्षा जास्त कृषिपर्यटन केंद्रे चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. नेरळ येथे चंद्रशेखर भडसावळे यांनी ‘सगुणाबाग’ कृषि पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषिपर्यटन हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे हे सिद्ध केले. कृषी पर्यटनामध्ये शेतकरी आपला शेती व्यवसाय सांभाळून आलेल्या पर्यटकांना शेतीतील पिकवली जाणारी पिके, पाटाचे पाणी, बैलगाडीत बसून फेरी, झुणका - भाकर, हुरडा यातून महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देतात. शेतकरी आपल्या शेतात निवासासाठी काही खोल्यांचे बांधकाम करून राहण्याची व्यवस्था करतात. सर्व पर्यटकांना एकत्रित बसता यावे यासाठी ग्रामीण पद्धतीचा सभामंडप, बहरलेली शेती, पिके, म्हैस, गाय, शेळी यांचे दूध पारंपरिक पद्धतीने काढणे, चुलीवरचा स्वयंपाक आपुलकीने खाऊ घालणे आणि त्याबरोबर महाराष्ट्रीयन लोककलांची ओळख अनेक शेतकरी करून देत आहेत. कृषी पर्यटनाचे फायदे कृषी पर्यटनाचे अनेक फायदे आहेत, शेतातील स्वत:च्या जागेतच कृषी पर्यटन केंद्र सुरु करता येत असल्यामुळे स्वतंत्र जागेची किंवा अतिरिक्त मोठ्या भांडवलाची गरज पडत नाही. शेतकऱ्यांसह गावातील युवकांना गावपातळीवर रोजगार उपलब्ध होतो. आज अनेक शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करीत असून त्यांनी शेतीत पिकवलेला हा ताजा माल शहरातल्या पर्यटकांना सहजतेने मिळतो. गावातील महिला बचत गटांनी तयार केलेला माल, वस्तू यांची विक्री करता येते. आदरातिथ्य फिरण्यासाठी घराबाहेर पडलेला पर्यटक चांगल्या आदरातिथ्याची अपेक्षा करतो. त्यामुळे आदरातिथ्य याकडे कृषी पर्यटन चालवण्याऱ्या उद्योजकाने भांडवल म्हणून बघितले पाहिजे, त्याचबरोबर स्वच्छता, निटनेटकेपणा हाही व्यवसायाच्या भांडवलाचाच भाग आहे. ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी मिळतात त्याठिकाणी ग्राहक-पर्यटक यांची पसंती अधिक असते. शहरातील आलेल्या पर्यटकांना शेती व्यवसाय व ग्रामीण जीवन पद्धतीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. शेतीविषयक कामामध्ये त्यांचा सहभाग करून घेतला तर त्यांना अत्यंत आनंद मिळतो. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) या संस्थेच्या वतीनेही 16 मे, हा दिवस जागतिक कृषीपर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील कृषी पर्यटनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘महाभ्रमण’ ‘निवास-न्याहारी’ असे उपक्रम अत्यंत पर्यटकप्रिय झाले आहेत. त्यात कृषी पर्यटनाच्या वाढीसाठी महामंडळाने मोठा वाटा उचलला आहे. नियोजनपूर्वक व्यवस्थितपणे ग्रामीण कलासंस्कृतीचा वापर करून, कृषी पर्यटन यशस्वी होऊ शकते हे महाराष्ट्रात अनेक शेतकरी-युवकांनी सिद्ध केले आहे. लेखक - शिवाजी मानकरसंचालक (माध्यम समन्वयक), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई स्त्रोत - महान्युज