अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज उपलब्धी वाढवणे, त्याचा वापर करणे यासाठी जगभरामध्ये सातत्याने संशोधन केले जात आहे. अपारंपरिक ऊर्जेतील महत्त्वाची ऊर्जा पवन ऊर्जा आहे. त्याच्या साह्याने अधिक प्रमाणात वीज मिळवण्यासाठी अमेरिकेतील आयोवा राज्य विद्यापीठामध्ये संशोधन केले जात आहे. डोंगराळ प्रदेश आणि सपाट प्रदेशात पवनचक्क्यांची संख्या ठरवण्याबरोबरच कमी जागेत अधिक पवनचक्क्यांची उभारणी करण्यासंदर्भात हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष "व्हीज्युलायझेशन' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकेत आयोवा राज्य विद्यापीठाच्या परिसरात देशातील दोन क्रमांकाची पवन ऊर्जा मिळवण्यात येते. पवन ऊर्जेसाठी पवनचक्क्या ज्या परिसरात उभ्या आहेत, त्या परिसरात वाहणारे वारे आणि टॉवरची उंची यावर ऊर्जा निर्मितीचा वेग अवलंबून असतो. आयोवा राज्य विद्यापीठ परिसरामध्ये असलेल्या पवनचक्की प्रकल्पामध्ये पवन ऊर्जेवर संशोधक हुई हू, यांग आणि सरकार हे संशोधन करत आहेत. त्यासाठी डोंगराची उंची आणि अन्य घटकांचा अभ्यास करून अभियंत्यांनी प्रयोगशाळेत एक प्रारूप तयार केले. त्याच्या साह्याने पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये परिसरातील डोंगराळ भाग आणि दरी या सोबत पवनचक्क्या उभारण्याची जागा याचा होणारा परिणाम तपासण्यात आला. विद्यापीठामध्ये अभियांत्रिकीचे प्राध्यापक हुई हू यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे प्रारूप (मॉडेल) बनवले. हे प्रारूप 1 ः 320 च्या स्केलमध्ये बनवण्यात आले होते. त्यावर वाऱ्याच्या प्रवाहानुसार ऊर्जा निर्मितीच्या चाचण्या घेण्यात आल्या. याबाबत बोलताना हू म्हणाले, की या प्रारूपामुळे संशोधन करणे सोपे आणि सुटसुटीत झाले. प्रारूप अत्यंत काटेकोरपणे मूळ प्रकल्पासारखेच बनवण्यात आले होते. त्या प्रारूपावर हे सर्व प्रयोग करण्यात आले. पवन ऊर्जेची सद्यःस्थिती आणि त्यात वाढ करण्यासंदर्भात प्रयोगात लक्ष केंद्रित केले होते. तसेच टर्बाइनचा आयुष्यकाळ वाढवण्यासाठी प्रयोग करण्यात आले. वाऱ्याच्या प्रवाहासोबत डोंगराळ भागातील वाहणाऱ्या वाऱ्याची हवेची मोजणी करणे, पवन चक्की उभारण्यासाठी योग्य जागा ठरवणे आणि मोठ्या प्रमाणावर पवन ऊर्जा फार्म विकसित करणे यासारख्या अनेक प्रश्नांवर या प्रयोगात अभ्यास करण्यात आला. त्यासाठी वाऱ्याचा वेग आणि आकार मोजण्यासाठी मिनी टर्बाईनवर सेन्सॉर बसवले, तसेच "व्हीलॉसिमेट्री'च्या साह्याने (लेसर आणि कॅमेरा यांचा वापर करून) वाऱ्यांतील कणांचा वेग आणि हालचाल मोजण्यात आली. वाऱ्याचे प्रवाहाचे क्षेत्र आणि त्याचा पवनचक्कीच्या पात्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला. या प्रयोगाचे प्राथमिक निष्कर्ष असे आहेत सपाट प्रदेशापेक्षा उंचावर असणाऱ्या प्रदेशातील वाऱ्याचा वेग आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा अधिक असते. डोंगराळ प्रदेशात एका टर्बाईनपासून दुसऱ्या टर्बाईनपर्यंत मिळालेली ऊर्जा सहजतेने वाहू शकते. वाऱ्याच्या प्रवाहाच्या माहितीनुसार, सपाट प्रदेशातील टर्बाईनचे अंतर हे टर्बाईनच्या व्यासाच्या सहा पट ठेवले असता विजेच्या उपलब्धतेत 13 टक्केने घट येते, तर उतारावरील भागात टर्बाईन बसविल्यास तीन टक्केने घट येते. म्हणजेच डोंगराळ प्रदेशात कमी अंतरावर टर्बाईन बसवता येणे शक्य आहे, त्यामुळे कमीत कमी जागेत अधिक पवनचक्क्यांचा वापर करून आयोवा आणि अन्य प्रदेशात वीज उपलब्ध करता येऊ शकते. स्त्रोत: अग्रोवन