अनेक वृक्षांची लागवड जैवइंधन बनवण्यासाठी करता येते. ह्या वृक्षांपासून अखाद्य म्हणजे खाण्यासाठी न वापरता येणारे परंतु उपयोगी तेल मिळू शकते. ह्यादृष्टीने सर्वांत योग्य वृक्ष म्हणजे करंज (पोंगामिया) होय. देशाच्या विविध भागांमध्ये ह्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पोंगामिया पिनाटा ही प्रजाति सगळीकडे आढळते. करंज वृक्षाची मुख्य वैशिष्ट्ये हा वृक्ष जमिनीतील नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण स्थिरीकरण करीत असल्याने जमिनीचा कस वाढतो. चरणारी जनावरे साधारणपणे ह्याला तोंड लावीत नाहीत. ह्याला पाणबोदाड, खारपडीची अथवा अल्कधर्मी जमीनदेखील चालते. खराब हवामान तसेच मध्यम आणि भरपूर पावसाला देखील हा तोंड देऊ शकतो. कसण्यायोग्य जमिनीप्रमाणेच नापीक अथवा पडीक जमिनीवरदेखील ह्याची लागवड करता येते. करंजाच्या बियांमध्ये सुमारे 30-40% तेल असते. ह्याच्या मुळांचे दाट जाळे आडव्या दिशेत पसरत असल्याने जमिनीची धूप थांबवणे आणि वालुकामय जमीन धरून ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. ह्याची मुळे, पाने, खोडाची साल आणि खोडातील गर ह्यांमध्ये औषधी गुण आहेत. धान्य साठवताना कीड दूर ठेवण्यासाठी करंजाची वाळलेली पाने वापरतात. करंजाच्या तेलाचे गुणधर्म मुख्यतः बियांपासून मिळणारे हे तेल खाण्यासाठी मात्र वापरता येत नाही. बीमध्ये 95% गर असतो. तेलाचे प्रमाण सुमारे 27 - 40% असते. गरापासून तेल काढण्यासाठी यांत्रिक एक्स्पेलरचा वापर केल्यास सुमारे 24 - 26.5% तेल मिळते. ह्या कच्च्या तेलाचा रंग पिवळसर-केशरी किंवा तपकिरी असू शकतो. काढलेले तेल एका ठिकाणी न हलवता ठेवल्यास रंग जास्त गडद बनतो. हे कडू चवीचे अखाद्य तेल असून त्याला भयंकर वास येतो. हे तेल जैवइंधन म्हणून वापरतातच तसेच दिवाबत्तीसाठी, वंगण, रंगामधील बंधक (बाइंडर), कीटकनाशक, साबण-उद्योग आणि कातडी कमावण्याच्या कामातही त्याचा वापर होतो. माणसांना तसेच जनावरांना होणार्या त्वचारोगांवरील उपचारांमध्ये आणि संधिवातावर उपाय म्हणूदेखील हे तेल वापरतात. तेल काढल्यानंतर उरणार्या चोथ्यामध्ये (ह्याला प्रेस-केक असे म्हणतात) नत्र भरपूर असते आणि त्यामुळे त्याचा वापर जमिनीचा कस वाढवण्यासाठी करता येतो. हा केक मातीत गाडल्यानंतर, त्याच्या कीटकनाशक गुणामुळे, नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी कीड आटोक्यात राहते. करंजाच्या बियांचे तेल आणि नेहमीच्या पेट्रोल/डिझेलची तुलना जैवइंधन म्हणून पाहिल्यास करंजाच्या तेलाचे बरेचसे गुणधर्म डिझेलप्रमाणेच आहेत. डिझेलपेक्षा करंजाचे तेल अधिक स्वच्छ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले (इको-फ्रेंडली) आहे.