आपण ऊर्जेची बचत करणे गरजेचे का आहे? प्रत्येकाची गरज भागवण्यापुरती नैसर्गिक साधनसंपत्ती पृथ्वीवर नक्कीच आहे परंतु प्रत्येकाची हाव पुरवण्याइतकी नाही-महात्मा गांधी ऊर्जेच्या निर्मितीपेक्षा आपण ऊर्जेचा वापर अधिक वेगाने करतो. कोळसा, तेल व नैसर्गिक वायू ह्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रकारांचा आपण सर्वाधिक वापर करतो. परंतु हे साठे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. ऊर्जेच्या स्रोतांना मर्यादा आहेत. जगातील एकूण ऊर्जास्रोतांपैकी आपल्या भारतामध्ये फक्त 1% स्रोत आहे परंतु आपली लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 16% आहे. आपण वापरत असलेले बहुतेक सर्व ऊर्जास्रोत पुन्हा वापरता येत नाहीत तसेच त्यांचे नूतनीकरणदेखील होऊ शकत नाही. इंधनाच्या एकूण वापरापैकी 80% वापर ह्या अशा नूतनीकरण न होणार्या स्रोतांचा आहे. असे म्हणतात की आपल्याकडील सध्याचे ऊर्जास्रोत पुढील फक्त 40 वर्षे पुरतील. ऊर्जेची बचत केल्याने आपण आपल्या देशाच्या पैशांची मोठी बचत करू शकतो. आपल्या देशाची कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी आपण सुमारे 75% तेल आयात करतो व त्यासाठी आपणांस दरवर्षी 1, 50, 000 कोटी रुपये खर्च येतो. ऊर्जेची बचत केल्याने आपण पैसे वाचवू शकतो. कल्पना करा की आपल्या घरातील गॅस सिलिंडर एखादा आठवडा जास्त चालल्यास अथवा विजेचे बिल कमी झाल्यास आपले किती पैसे वाचतील. ऊर्जेची बचत केल्याने आपण आपली स्वतःचीदेखील ऊर्जा वाचवू शकतो. जळाऊ लाकडाचा वापर आपण कार्यक्षमतेने केल्यास आपली लाकडाची एकंदर गरज कमी होईल व ते गोळा करण्यामध्ये होणारा त्रासदेखील वाचेल. ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जानिर्मितीच होय. आपण वाचवलेले ऊर्जेचे एक युनिट हे निर्माण केलेल्या ऊर्जेच्या दोन युनिट्सइतके असते. प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील ऊर्जेची बचत करणे गरजेचे आहे. ऊर्जानिर्मिती व तिचा वापर ह्यामधून हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते तसेच हरितगृह-वायूंच्या उत्सर्जनापैकी त्याचा वाटा 83% पेक्षाही अधिक आहे. भविष्यकाळाचा विचार करून आजच बचत करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याकडील एका जुन्या महणीचा अर्थ असा सांगता येईल - “जमीन, पाणी व हवा ह्या गोष्टी म्हणजे आपणांस आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देणगी नसून आपल्या मुलांनी आपणांस दिलेले कर्ज आहे असे समजा.” स्वतःला बचतीची सवय लावा.