भारतीय वंशाच्या दीपिका कुरूप या १४ वर्षीय मुलीने सौरऊर्जेवर आधारित जल शुद्धीकरण प्रणाली विकसित केली आहे. या संशोधनासाठी तिला ‘द डिस्कव्हरी एज्युकेशन ३ एम यंग सायंटिस्ट चॅलेंज’ या स्पर्धेमध्ये २५ हजार डॉलर रुपयांचा पुरस्कार मिळाला. सध्या ती आठवीला शिकत आहे. ‘ना नफा’ तत्त्वावरील संस्थेची स्थापना करून या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची तिची इच्छा आहे. विकसनशील देशामध्ये शुद्ध पाण्याची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. सध्या अतिनिल किरणाद्वारा जीवाणू नष्ट करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी वापरली जाते. मात्र या प्रक्रियेसाठी विजेची गरज असते. दुर्गम भागामध्ये विजेची उपलब्धता असतेच असे नाही. या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी दीपिकाने उन्हाळी सुटी आणि तीन महिन्यांच्या प्रकल्प कालावधीमध्ये पाणी शुद्धीकरणासंदर्भात विविध संशोधनाचा अभ्यास केला. त्यातील पाणी शुद्धीकरणासाठी योग्य वाटलेल्या प्रणालीच्या चाचण्या आपल्या घराच्या परिसरामध्ये घेतल्या. या चाचण्यासाठी अत्यंत प्रदूषित सांडपाण्याचा वापर केला. सौरऊर्जेचा वापर करणारी, सहज वापरण्यास सोपी आणि स्वस्त अशी पद्धती दीपिकाने वेगळी केली आहे. अशी आहे सौरऊर्जा आधारित पद्धती पाण्यामध्ये टिटानियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड मिसळल्यानंतर काही काळ स्थिर ठेवले जाते. पाणी स्थिर झाल्यानंतर ही मूलद्रव्ये तळाशी जातात. त्यांच्याशी सूर्यप्रकाशाची प्रक्रिया होऊन हायड्रॉक्सिल रॅडिकल्स तयार होतात. ती प्रदूषित पाण्यातील बहुतांशी हानिकारक जिवाणूंचा नाश करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. केवळ काही तासांमध्ये पाणी शुद्ध होते. या मूलद्रव्यासाठी प्रति ग्रॅम अर्धा सेंट (रुपयामध्ये ६० ते ७० पैसे) इतकाच खर्च होतो. या मूलद्रव्यामुळे पाण्याच्या चवीमध्ये कोणताही फरक पडत नाही. अशा ठिकाणी नव्या प्रक्रियेमुळे ताजे आणि शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकते. या प्रक्रियेच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्त्रोत: अग्रोवन